शिराळशेठ यांचा उत्सव उत्साहात
By Admin | Published: August 3, 2014 12:53 AM2014-08-03T00:53:40+5:302014-08-03T01:11:55+5:30
संजय जाधव, पैठण साडेतीन घटकेचा बादशहा म्हणून इतिहासात आपल्या दातृत्वाने अजरामर झालेल्या पैठण येथील शिराळशेठ यांचा महोत्सव श्रीयाळ षष्ठीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संजय जाधव, पैठण
साडेतीन घटकेचा बादशहा म्हणून इतिहासात आपल्या दातृत्वाने अजरामर झालेल्या पैठण येथील शिराळशेठ यांचा महोत्सव श्रीयाळ षष्ठीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात पुणे व पैठण येथे हा लोकोत्सव साजरा करण्यात येतो. पैठण येथे या उत्साहास ६८ वर्षांची परंपरा असल्याचे या कार्यक्रमाचे संयोजक जयभवानी क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी
सांगितले.
नागपंचमी व त्याला जोडून श्रीयाळ षष्ठी पैठण येथे मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येते. नागपूजेचा महिमा पैठण परिसरात अनादि काळापासून आहे. शककर्ता शालिवाहन सम्राट हे नागवंशीय होते, तेव्हापासून त्यांच्या राजवाड्याच्या बाजूलाच गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नागघाटावर नागपंचमी व पिठुंबरा परिसरात दुसऱ्या दिवशी श्रीयाळ षष्ठी साजरी करण्यात येत आहे.
नागघाटावरील नाग देवता पुत्रदायिनी असल्याची धारणा असल्याने मोठ्या संख्येने महिलांनी नागदेवतेचे दर्शन घेऊन गोदावरी नदीत नौकाविहाराचा आनंद लुटला. शिराळशेठ महोत्सवात मोठ्या संख्येने महिला व पुरुषांनी शिराळशेठ यांच्या पुतळ्याचे दर्शन घेत पूजा-अर्चा केली. शहरात शिराळशेठ यांचा मातीचा पुतळा उभारण्यात आला होता. रात्री १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरू होता.
कोण होते शिराळशेठ?
पैठण येथे इतिहास प्रसिद्ध अनेक गर्भश्रीमंत सावकार होते. त्यातील शिराळशेठ हे एक होते. सन १८३२ मध्ये दक्षिण भारतात तीव्र दुष्काळ पडला होता. अन्न व पाणी यासाठी जीव गमावण्याची वेळ जनतेवर आली होती. व्यवसायाने सावकार; परंतु मनाने उदार असलेल्या शिराळशेठ यांनी स्वत:जवळ असलेल्या धान्यांची कोठारे गोरगरिबांना देण्याचा निर्णय घेऊन तो दक्षिण भारतात स्वखर्चाने वितरित केला व लाखो लोकांचा जीव वाचविला.
तत्कालीन राजाने शिराळशेठ यांचे दातृत्व ओळखून त्यांना सत्काराचे निमंत्रण दिले व शिराळशेठ यांनी काहीही मागावे असे त्यांना सूचित केले. यावर धनदौलत न मागता शिराळशेठ यांनी साडेतीन घटकेसाठी मला राजा करा, अशी विनंती राजाकडे केली व ती मान्य करण्यात आली. साडेतीन घटकेचा राजा होताच शिराळशेठ यांनी गोरगरिबांच्या जमिनी त्यांना परत देण्याचा निर्णय घेतला. नाण्याचा शिक्का चामड्यावर मारून त्याचा पैशाच्या रूपात वापर करण्याचा निर्णय घेतला.
शिराळशेठ यांच्या उपकाराचे विस्मरण होऊ नये म्हणून व दानशूर लोकांना प्रेरणा मिळावी, त्यांचा मानसन्मान व्हावा या हेतूने गेल्या ६८ वर्षांपासून पैठण-पुणे येथे हा लोकोत्सव साजरा होत आहे.
श्रीयाळ षष्ठीनिमित्त हा उत्सव महाराष्ट्रात विविध ठिकाणी साजरा व्हायचा. औरंगाबादच्या गुलमंडी, खोकडपुरा, फकीरवाडी भागांत हा उत्सव साजरा होत होता. कालांतराने तो बंद पडला. पैठणमध्ये शिराळशेठ यांच्या मातीच्या प्रतिमा तयार करून हा उत्सव साजरा व्हायचा, आता फक्त पिठुंबरा गल्लीत हा उत्सव साजरा होतो.