चढता आलेख! ‘नॅक’चे ‘ए प्लस’ मानांकन मिळताच विद्यापीठात आनंदोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 05:09 PM2024-11-01T17:09:52+5:302024-11-01T17:10:59+5:30

ऐन दिवाळीत मिळाली आनंदाची वार्ता; कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पदभार स्वीकारल्यापासून ‘नॅक’ मूल्यांकनाचा विषय मिशन मोडवर घेतला होता.

Celebrations in the BAMU university after getting 'A plus' rating of 'NAAC'; Will take the university forward with all: Vice-Chancellor Vijay Fullari | चढता आलेख! ‘नॅक’चे ‘ए प्लस’ मानांकन मिळताच विद्यापीठात आनंदोत्सव

चढता आलेख! ‘नॅक’चे ‘ए प्लस’ मानांकन मिळताच विद्यापीठात आनंदोत्सव

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला राष्ट्रीय अधिस्वीकृती व अधिमान्यता परिषदेने (नॅक) ३.३८ ‘सीजीपीए’सह ‘ए प्लस’ मानांकन गुरुवारी (दि. ३१) सकाळी जाहीर केले. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पदभार स्वीकारल्यापासून ‘नॅक’ मूल्यांकनाचा विषय मिशन मोडवर घेतला होता. त्यास यश मिळाले आहे. विद्यापीठाचा दर्जा सुधारल्यामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील निधी मिळविण्यातील अडचणी आता दूर होणार आहेत.

विद्यापीठाचे पंचवार्षिक मूल्यांकन करण्यासाठी ’नॅक पिअर टीम'ने २२ ते २४ ऑक्टोबरदरम्यान भेट दिली होती. स्वयंमूल्यमापन अहवाल व पिअर टीम भेटीच्या अहवालानंतर ‘नॅक’च्या स्थायी समितीने ‘ए प्लस’ दर्जा बहाल केला आहे. ‘नॅक’चे माजी संचालक व माजी कुलगुरू प्रा. ए. एन. राय यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय ‘पिअर टीम’मध्ये देशातील नामवंत प्राध्यापकांचा सहभाग होता. त्यांनी विद्यापीठाचे मूल्यांकन केले आहे. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी २४ जानेवारी रोजी कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ‘नॅक’चे काम प्राधान्याने हाती घेतले. पदभार घेतल्यानंतर पहिली बैठक ‘अंतर्गत गुणवत्ता हमी सेल समिती’ (आयक्वॅक) सोबतच घेतली. त्यानंतर ‘आयक्वॅक’चे संचालक डॉ. गुलाब खेडकर यांच्या टीमने अविरत परिश्रम घेऊन तब्बल ७२ हजार कागदपत्रांचे संकलन केले. त्यानंतर ‘नॅक’कडे ‘आयआयक्यूए’ २१ मार्च रोजी सादर केला. त्यास ४ एप्रिल रोजी मान्यता मिळाली. त्यानंतर ‘स्वयं मूल्यमापन अहवाल’ (एसएसआर) १६ मे रोजी सादर केला. या पाठविलेल्या माहितीची पडताळणी १६ जून रोजी झाल्यानंतर ४ सप्टेंबर रोजी नॅकने मूल्यांकनास पात्र ठरविले. त्यानंतर तयारी म्हणून विद्यापीठ प्रशासनाने २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान ‘मॉक नॅक’ घेतले. मॉक नॅकमध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करीत प्रत्यक्ष नॅक मूल्यांकनास २२ ते २५ ऑक्टाेबरदरम्यान विद्यापीठ सामाेरे गेले. त्याचा निकाल ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. २९ ऑक्टोबर २०२९ पर्यंत या मूल्यांकनाची मुदत असणार आहे.

विद्यापीठात आनंदोत्सव
ऐन दिवाळीत विद्यापीठाचा दर्जा वाढल्यामुळे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, आयक्यूएसीचे संचालक डॉ. गुलाब खेडकर, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह अधिष्ठाता, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

विद्यापीठाचा चढता आलेख
विद्यापीठाचे आतापर्यंत चारवेळा ‘नॅक’कडून मूल्यांकन झाले आहे. २००३ मध्ये कुलगुरू के. पी. सोनवणे यांच्या कार्यकाळात पहिल्यांदा ‘नॅक मूल्यांकन’ झाले. तेव्हा ‘बी प्लस’ (२.९२ सीजीपीए) दर्जा मिळाला. त्यानंतर २०१३ मध्ये कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या कार्यकाळात ‘ए’ (३.०७) आणि २०१९ मध्ये कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळात ‘ए’ (३.२२) दर्जा मिळाला होता. विद्यमान कुलगुरूंच्या कार्यकाळात ‘ए प्लस’ (३.३८) दर्जा मिळाला आहे. प्रत्येक ‘नॅक’च्या मूल्यांकनात विद्यापीठाच्या दर्जामध्ये वाढ झाली आहे.

राज्यातील चौथे विद्यापीठ
राज्यात अकृषी विद्यापीठांमध्ये ‘ए प्लस’ दर्जा मिळविणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे चौथे विद्यापीठ ठरले आहे. यापूर्वी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विद्यापीठात ‘ए प्लस’ किंवा त्यापेक्षा अधिक दर्जा मिळालेला आहे.

सर्वांच्या सोबतीने विद्यापीठाला पुढे नेऊ
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठास ‘नॅक’चे ‘ए प्लस’ मानांकन मिळाले ही अत्यंत अभिमानाची, आनंदाची व ऐतिहासिक अशी घटना आहे. आगामी काळात देखील सर्वांना सोबत घेऊन विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा व नावलौकिक उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येणार आहे.
-डॉ. विजय फुलारी, कुलगुरू

Web Title: Celebrations in the BAMU university after getting 'A plus' rating of 'NAAC'; Will take the university forward with all: Vice-Chancellor Vijay Fullari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.