सिमेंट व्यवसायही मंदीत; मागणी निम्म्याने घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 07:14 PM2019-08-22T19:14:20+5:302019-08-22T19:25:23+5:30
१४ दिवसांमध्ये गोणीमागे २५ ते ३० रुपयांनी घटले दर
औरंगाबाद : देशात मागणीअभावी विविध क्षेत्रांना मंदीला सामोरे जावे लागत आहे. त्यातील एक सिमेंट उद्योग होय. बांधकाम क्षेत्रातून उठाव कमी झाल्याने सिमेंटचे भाव गडगडत आहेत. मागील १४ दिवसांत पुन्हा एकदा गोणीमागे २५ ते ३० रुपयांनी भाव घटले. आजघडीला बाजारात ३०० ते ३०५ रुपये प्रतिगोणी सिमेंट विकले जात आहे. सिमेंटची मागणी निम्म्याने घटल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
मराठवाड्यात पाणीटंचाईमुळे अनेक नागरिकांनी आपले बांधकाम पुढे ढकलले आहे. रेरानुसार वेळेत प्रकल्प पूर्ण करावा लागत असल्यामुळे फक्त बांधकाम व्यावसायिकांचे मोठे प्रकल्प सुरू आहेत. तीन ते साडेतीन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीआधी सिमेंटचे भाव ३६० ते ३८० रुपये प्रतिगोणीपर्यंत झाले होते. सिमेंटच्या भावातील आजवरचा हा उच्चांक होता. मात्र, निवडणुकीनंतर मंदीची लाट आली. परिणामी, सिमेंट उत्पादक कंपन्यांनी भाव कमी करणे सुरू केले. ७ आॅगस्टपर्यंत सिमेंटचे भाव ३५ ते ५५ रुपयांपर्यंत कमी होऊन ३२५ ते ३३५ रुपये प्रतिगोणी झाले होते. त्यानंतर १४ दिवसांत आणखी २५ ते ३० रुपयांनी स्वस्त होत आज किरकोळ विक्रीत सिमेंट ३०० ते ३०५ रुपये प्रतिगोणी विकले जात आहे.
होलसेलमध्ये सिमेंट गोणी २७० ते २९५ रुपयांना मिळते आहे. मागील साडेतीन महिन्यांत ६० ते ७५ रुपयांनी सिमेंट स्वस्त झाले. बांधकाम करण्यासाठी हाच योग्य काळ असल्याचे सिमेंट व्यावसायिकांनी सांगितले. औरंगाबाद शहरात महिन्याकाठी ८० हजार टन सिमेंट विकले जाते. मात्र, सध्या ४० ते ५० टक्के विक्री घटली आहे. गणेशोत्सवापासून रिअल इस्टेटमध्ये मागणी वाढण्यास सुरुवात होते व दिवाळीपर्यंत ही मागणी असते. त्यामुळे आगामी काळात सिमेंटच्या मागणीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे.
स्टीलचे भाव स्थिर
दीड महिन्यापूर्वी ४३ हजार रुपये टनने सळई विक्री होत असे. सध्या ३७ हजार रुपये टनाने विकली जात होती. म्हणजे ६ हजार रुपयांनी भाव कमी झाले. मागील आठवडाभर स्टीलचे भाव स्थिर होते. शहरात दर महिन्याला दीड हजार टन स्टील विकले जाते, असेही व्यावसायिकांनी सांगितले.