सातारा-देवळाईत सिमेंटचे जंगल; मनपाच्या कुशीत येताच शहराच्या दक्षिणेला उभे राहिले टोलेजंग नवे शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 02:11 PM2018-07-09T14:11:10+5:302018-07-09T14:14:04+5:30
झाडाझुडपांवर कु-हाड चालवून टोलेजंग बंगले, इमारतीने जमीन व्यापली. सेवा-सुविधा नसल्या तरी आजही शहराच्या दक्षिणेला एक टोलेजंग शहर अस्तित्वात आले आहे.
- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : शहराला दूध व भाजीपाला पुरविणाऱ्यात आतापर्यंत अग्रेसर असलेल्या सातारा-देवळाईत वाढत्या नागरीकरणाने शेती संपुष्टात आली. झाडाझुडपांवर कु-हाड चालवून टोलेजंग बंगले, इमारतीने जमीन व्यापली. सेवा-सुविधा नसल्या तरी आजही शहराच्या दक्षिणेला एक टोलेजंग शहर अस्तित्वात आले आहे.
२५ वर्षांच्या काळात खंडोबा यात्रा उत्सवाशिवाय मोठा जनसमुदाय दिसत नव्हता. परंतु आता बायपासपासून ते सातारा, गांधेली, देवळाई, नक्षत्रवाडीच्या डोंगरालगत वसाहती जाऊन भिडल्या आहेत. शहरातील जास्तीची वाहतूक बीड बायपासकडून वळविली अन् झाल्टा ते गांधेली, बाळापूर, देवळाई, सातारा परिसराचे रूपच पालटले, ग्रीन बेल्ट येलो झोनमध्ये आला अन् पाहता पाहता शेतजमिनीवर पिकांऐवजी सिमेंटचे जंगल उभे राहिले.
शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधींनीदेखील प्राधान्य दिल्याने या परिसराला महत्त्व प्राप्त झाले. बँका, रक्तपेढी, रुग्णालय, सर्वात महागडे मंगल कार्यालय, मॉलदेखील या भागात येऊन पोहोचले आहेत.
स्मार्ट सिटीत समाविष्ट होणार असल्याने तसेच आवतीभोवतीच्या औद्योगिक क्षेत्राच्या कनेक्टिव्हिटीदेखील सातारा-देवळाईतील जागेला अधिक पसंती दिली जात आहे. त्या तुलनेत परिसरातील नागरिकांना रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज इत्यादींसह अपघात रोखण्यासाठी सर्व्हिस रोड देण्यावर मनपाने भर देण्याची आवश्यकता आहे. परंतु या रस्त्यासाठी राजकीय श्रेय लाटण्याचा प्रकार सुरू असल्याने निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार सातारा-देवळाई ;
- देवळाई- १०,७६० लोकसंख्या आणि ७ हजार मालमत्ता ग्रामपंचायतीच्या काळात होत्या.
- २०१८ पर्यंत जवळपास १६ हजार लोकसंख्या आणि १२ हजार मालमत्ता, तसेच मनपाच्या काळात उभ्या राहिलेल्या सदनिकांचा आकडा वेगळाच आहे
- मनपाने केलेल्या सर्वेमध्ये ती ३० हजारांपेक्षा जास्त झाली आहे.
- सातारा परिसरात एन-४७ बी साठी जमा झालेल्या १०,५०० मालमत्तांची नोंद ग्रामपंचायतीच्या काळात झाली होती.
- टोलेजंग इमारतींचा हिशोब वेगळाच आहे.
- सातारा- देवळाईची एकूण लोकसंख्या १ लाखाच्या वर येऊन ठेपली आहे.
सुविधांची वानवा
ग्रामपंचायतीच्या काळात परिसरातील लोकवसाहतीत वाढ झाली, सेवा-सुविधा देण्यात ग्रामपंचायती अपयशी ठरू लागल्याने नगर परिषदेकडे जाण्याचा नागरिकांनी कल दिला. शासनाने नगर परिषददेखील जाहीर केली; परंतु शहरात असलेल्या वसाहतीला मनपात समाविष्ट करण्यात आले. त्यालाही दोन वर्षे पूर्ण होत असून, सेवा-सुविधा मात्र अजूनही शून्य आहेत. येथील परिसराला मनपा कर आकारते. सुविधाच्या नावाने बोंबाबोंब कायम ठेवली आहे.
- माजी सरपंच करीम पटेल (देवळाई)
मालमत्तेचा घोळ कायम
शहरातील गर्दीतून अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सातारा परिसरात धाव घेतली. बायपासमुळे परिसराचे चित्रच बदलले असून, एनए-४४ च्या मालमत्तांधारकांना नव्हे; परंतु ४५, ४७ -बी हा घोळ अद्यापही संपलेला नाही. त्यामुळे जनतेला सतत अडचणीला सामोरे जावे लागत आहे. मालमत्तांच्या नोंदणीतही अजून हजारो मालमत्तांना मनपाने कर लावलेला नाही. नवनिर्माण सदनिका पाहता परिसरात सिमेंटचे जंगलच तयार झाले आहे.
- माजी सरपंच यशवंत कदम (सातारा)