स्टीलपाठोपाठ सिमेंटचे भावही कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 08:19 PM2020-01-03T20:19:41+5:302020-01-03T20:23:07+5:30
सध्या बांधकाम क्षेत्रापेक्षा शासकीय पायाभूत सुविधांच्या कामामुळे सिमेंटचे दर वाढत असल्याचे सांगितले जात आहे.
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : स्टीलच्या भाववाढीपाठोपाठ सिमेंटच्या किमतीतही गोणीमागे ३० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे बांधकामाचे बजेट कोलमडले आहे. राज्यात महिन्याकाठी २४ ते २५ लाख टन सिमेंटची विक्री होते. सध्या बांधकाम क्षेत्रापेक्षा शासकीय पायाभूत सुविधांच्या कामामुळे सिमेंटचे दर वाढत असल्याचे सांगितले जात आहे.
२०२२ पर्यंत देशातील सर्वांना हक्काचे घर देण्याची केंद्र सरकारची योजना आहे. मात्र, बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमतीमुळे किफायतशीर दरात घर उभारणी कशी करायची, असा यक्षप्रश्न बांधकाम व्यावसायिकांना पडला आहे. ज्यांनी बांधकाम सुरू केले त्यांचे बजेट मात्र, स्टील व सिमेंटच्या भाववाढीमुळे कोलमडले आहे. कंपन्यांनी नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशीच सिमेंटच्या भावात प्रतिगोणी ३० रुपयांनी वाढ केली असून, ३०० ते ३१० रुपये प्रतिगोणी सिमेंट विकल्या जात आहे. जिल्हा सिमेंट डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनोज रुणवाल यांनी सांगितले की, सध्या बांधकाम क्षेत्रातून सिमेंटला मागणी कमी आहे. मात्र, शासकीय कामे जोरात सुरू आहे. मागणी वाढत असल्याने कंपन्यांनी भाववाढ सुरु केली आहे. चालू महिन्यात दोन टप्प्यात सिमेंटची भाववाढ होण्याची चर्चा आहे. २ जानेवारी रोजी ३० रुपयांनी भाववाढ करण्यात आली. येत्या ६ तारखेलाही आणखी भाववाढ होईल, असे कंपनीचे अधिकारी सांगत आहेत.
मागील वर्षी २५ जानेवारी २०१९ रोजी सिमेंट गोणीमागे ३१ रुपयांनी भाव वाढून ३०६ रुपये विक्री झाली होती. सिमेंटचा उठाव घटल्याने ५ फेब्रुवारी रोजी २१ रुपये कमी करून २८५ रुपयांपर्यंत भाव खाली आले होते. त्यानंतर मार्च संपण्याच्या आत शासकीय कामे पूर्ण करण्याकरिता मागणी वाढल्याने एप्रिल महिन्यात ३८० रुपयांपर्यंत सिमेंटच्या किमतीने उच्चांक गाठला होता. मात्र, नंतर भाव कमी होत आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात २८० रुपयांपर्यंत खाली आले. आता पुन्हा मार्चअखेरपर्यंत सरकारी योजनांचा निधी खर्च करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या कामांना वेग आल्याने गोणीमागे ३० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. घराच्या एकूण किमतीत ८ ते ९ टक्के स्टीलवर तर ९ ते १० टक्के सिमेंटवर खर्च होतो.
सिमेंट भाववाढीनंतर पाईप, पेव्हरब्लॉकमध्येही भाववाढ होण्याचे संकेत आहेत. आता स्टीलवर १८ टक्के, सिमेंटवर २८ टक्के जीएसटी आकारला जातो. जीएसटीचे दर कमी केले तर त्याचा गृहेच्छुकांना फायदा होईल, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात महिन्याकाठी ९० हजार मेट्रिक टन मेट्रिक टन सिमेंट विकल्या जाते, असेही रुणवाल यांनी सांगितले.
लोखंडी पाईप, सीआरसी पत्राही महागला
मागील १० दिवसांत ६ एम.एम.च्या सळईमध्ये किलोमागे ५ रुपयांनी वाढ होऊन सळई ४० रुपये किलोने विकली जात आहे. औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केल्यास दररोज ५०० ते ६०० टन सळईची विक्री होते. सळईमध्ये भाववाढ होताच लोखंडी पाईपमध्ये ५ रुपये वाढून ५० रुपये किलो तर सीआरसी पत्र्यांचे भाव ३ रुपयांनी वाढून ५२.५० रुपये किलोने विकले जात आहेत. मात्र, लोखंडी कास्टिंगच्या भावात सध्या वाढ झालेली नाही हीच ग्राहकांसाठी थोडीशी दिलासादायक बाब होय.