नक्षत्र पार्क वसाहतीत सिमेंट रस्ता मंजूर, पण ओबडधोबड रस्त्यावरून दामटावी लागते गाडी
By साहेबराव हिवराळे | Published: December 21, 2023 03:11 PM2023-12-21T15:11:56+5:302023-12-21T15:12:12+5:30
नक्षत्र पार्क शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत अजून किती दिवस अविकसित
छत्रपती संभाजीनगर : नक्षत्र पार्कमध्ये जाण्यासाठी सिमेंट रस्ता मंजूर होऊन अनेक दिवसांचा कालावधी उलटला तरी दगडावर आदळआपट करीतच जावे लागते. ज्येष्ठ कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचविताना तारेवरची कसरत करावी लागते. सोलापूर हायवेवरून नक्षत्र पार्क व म्हाडा वसाहत दिसते. पैठण रोडवर जा-ये करण्यासाठी नक्षत्र पार्कचा रस्ता अडचणीचा ठरलेला आहे. पावसाळ्यात शाळेची बसदेखील घरापर्यंत येत नाही. त्यावेळी शाळेला दांडी मारावी लागते. शासकीय कर्मचारी येथे वास्तव्यास असून, गैरसोयीवर कुणीही बोलत नाही.
महानगरपालिकेच्या निधीतून रस्ता मंजूर झाला आहे. नक्षत्र पार्कमध्ये जाण्यासाठी दुसऱ्याच्या प्लॉटमधून जावे लागते. सरपटणारे प्राणी अंगणात दिसतात. पाण्याचे नळ देण्यात आलेले असले तरी ते गल्लीतच प्लास्टिकच्या पाइपने जोडलेले आहेत. एखादी चारचाकी त्यावरून गेली तर रस्त्यावर पाणी वाहते. पाणी भरताना कुटुंबाना खूप त्रास सहन करावा लागतो. पाचशे ते सहाशे लोकांच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या सदनिका असून, ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याचा मुख्य प्रश्नच नागरिकांना भेडसावतो. त्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
किती दिवस प्रतीक्षा..
पावसामध्ये रस्त्यावर चालताना चिखल होतो. बरेच नागरिक पडतात, गाड्या स्लीप होतात. या रस्त्याचे भूमिपूजन सहा महिन्यांपूर्वी महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत, आमदार संजय सिरसाठ यांच्या हस्ते झाले, पण अजून कामाला काही मुहूर्त लागलेला नाही. नागरिकांना कसाबसा रस्ता पार करीत शहर गाठावे लागते. अतिगंभीरप्रसंगी वाहनाला परिसर सापडत नाही. अजून किती दिवस सेवा-सुविधाची प्रतीक्षा करावी लागणार ?
- अशोक साळवे (नागरिक)
घराच्या अंगणात सरपटणारे प्राणी...
नक्षत्र पार्कच्या परिसरात मनपाचे सफाई कर्मचारी फिरकत नाही, स्वच्छता केली जात नाही. गाजर गवत कायम असते. यामुळे साप व सरपटणारे प्राणी नागरिकांच्या घरालगत तसेच अनेकदा अंगणातही आढळतात. त्यामुळे नागरिकांत भीती निर्माण झालेली आहे.
- नितीन शेजवळ (नागरिक)
विजेचा प्रश्न सोडवा..
रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असल्याने घरापर्यंत अनेकदा अंधारातून जावे लागते. कामगारांना घर गाठताना गैरसोयीला तोंड द्यावे लागते. वीजपुरवठा खंडित झाल्यावर अधिकाऱ्यांना फोन करून सांगितले तरी लवकरच दुरुस्ती होईल, याचीही शक्यता नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अडचणी येतात.
- सिकंदर कुमार (नागरिक)
सेफ्टी टँकच्या सफाईसाठी धावपळ...
नक्षत्र पार्क येथे ड्रेनेज लाईनचे सांडपाणी सेफ्टी टँकमध्ये सोडण्यात येते, ती भरल्यानंतर सफाईसाठी महानगरपालिकेची गाडी बोलाविल्यास ती येत नाही. अशावेळी वर्गणी गोळा करून ती सफाई करावी लागते. मनपाच्या वतीने ड्रेनेज लाईन टाकली; परंतु तीही अपूर्णच असून, त्यास जोडणी करण्यासाठीचा खर्च नागरिकांच्या खिशाला न परवडणारा आहे.
- अभिजित नरवडे (नागरिक)
कचरा सफाई व औषध फवारणी तरी करा...
अस्वच्छतेमुळे डासांचा त्रास वाढलेला आहे. शाळकरी मुलांना थंडी तापाचा आजार अंगावर काढण्याची वेळ आलेली आहे. मनपाचे पथक येथे फिरकले देखील नाही व सफाई कर्मचारीदेखील येथे येत नाहीत. पावसाळ्यात तर या नक्षत्र पार्कमध्ये नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रहदारीच्या रस्त्यावर स्वच्छता ठेवण्यास कुणाला सांगावे, असा प्रश्न पडतो.
- गौतम वानखेडे (नागरिक)