माणगाव परिषदेचे शताब्दी वर्ष विद्यापीठ साजरे करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:51 PM2019-06-13T23:51:47+5:302019-06-13T23:52:51+5:30
कोल्हापूरमधील माणगाव येथे १९२० मध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी आयोजित सभेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची देशपातळीवर ओळख झाली. या ऐतिहासिक घटनेचे शताब्दी वर्ष कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ आणि येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संयुक्तरीत्या साजरे करणार आहे, अशी माहिती कुलगुरू देवानंद शिंदे यांनी गुरुवारी (दि.१३) पत्रकार परिषदेत दिली.
औरंगाबाद : कोल्हापूरमधील माणगाव येथे १९२० मध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी आयोजित सभेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची देशपातळीवर ओळख झाली. या ऐतिहासिक घटनेचे शताब्दी वर्ष कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ आणि येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संयुक्तरीत्या साजरे करणार आहे, अशी माहिती कुलगुरू देवानंद शिंदे यांनी गुरुवारी (दि.१३) पत्रकार परिषदेत दिली.
राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे होते. १९२० ला कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथे शाहू महाराजांनी मागासवर्गीयांची परिषद आयोजित केली होती. या परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रथमच शाहू महाराजांनी, ‘मागासवर्गीयांनो तुम्हाला तुमचा नेता मिळाला’ असे सांगून बाबासाहेब हे देशाचे नेते आहेत असे त्यांच्या भाषणातून जाहीर केले. या ऐतिहासिक घटनेचे हे शताब्दी वर्ष आहे. हे वर्ष कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ आणि येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संयुक्तरीत्या साजरे करणार आहे. या माध्यमातून दोन्ही विद्यापीठे विविध उपक्रम राबवून महापुरुषांना अभिवादन करतील, अशी माहिती कुलगुरू देवानंद शिंदे यांनी दिली.
परिषदेची माहिती व्यापक व्हावी
माणगाव परिषद ही घटना मोठी असून, याबद्दल पुरेसे बोलले जात नाही. यानंतरच खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा घटनाकार म्हणून उदय झाला. नव्या पिढीला याची माहिती व्हावी, या घटनेची व्यापकता वाढून प्रबोधन व्हावे या हेतूने दोन्ही विद्यापीठे हे शताब्दी वर्ष साजरे करणार असल्याचेही कुलगुरू शिंदे यांनी सांगितले.
व्यवस्थापन सुधार हेच लक्ष
विद्यापीठातील शिक्षक-विद्यार्थी, कर्मचारी- अधिकारी यात सुसंवाद व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे कुलगुरू शिंदे यांनी सांगितले. तसेच सध्या सुरू असलेल्या सीईटी आणि त्यानंतर प्रवेश प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडणे हे मुख्य काम आहे. विद्यापीठात विद्यार्थी हे केंद्रस्थानी असून, शिक्षक हा गाभा असून येथील बौद्धिक संपदेचा योग्य वापर करण्यासंदर्भात योग्य निर्णय घेण्यात येतील. विविध विभागातील रिक्त पदांवर सीएसबीवरील प्राध्यापकांच्या नियुक्त्या प्राधान्याने करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. यासोबतच विद्यार्थिनी वसतिगृहातील अडचणी स्वत: जाऊन पाहणार असल्याची माहितीसुद्धा कुलगुरू शिंदे यांनी दिली.