कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र पश्चिम महाराष्टÑात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:47 AM2018-04-24T00:47:05+5:302018-04-24T00:48:12+5:30
कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रात उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सोलापूर येथे हे केंद्र उभारण्यात येणार असून, त्याचा मराठवाड्याला फारसा लाभ होणार नाही, असे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. यानिमित्ताने मराठवाड्याची पुन्हा उपेक्षा होण्याची शक्यता आहे. हे केंद्र औरंगाबादेत सुरू करण्यासाठी २०१५ पासून विषय चर्चेला येत होता.
विकास राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रात उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सोलापूर येथे हे केंद्र उभारण्यात येणार असून, त्याचा मराठवाड्याला फारसा लाभ होणार नाही, असे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. यानिमित्ताने मराठवाड्याची पुन्हा उपेक्षा होण्याची शक्यता आहे. हे केंद्र औरंगाबादेत सुरू करण्यासाठी २०१५ पासून विषय चर्चेला येत होता.
केंद्रीय विज्ञान मंत्रालय व राज्य शासनाच्या साहाय्याने सोलापूर येथे कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी केंद्र सुरु होणार आहे. येत्या १ जूनपासून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे. १०० कोटींच्या खर्चाची तरतूद यासाठी करण्यात येत असून, त्यातून दोन विमानांची खरेदीदेखील करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
सोलापूर, सांगली जिल्ह्यातील मानदेशाचा कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा, उस्मानाबाद, लातूर व शेजारच्या कर्नाटकातील बीदर या पर्जन्यछायेतील प्रदेशाला याचा लाभ होईल. त्यामुळे सोलापूर येथे सी-डॉप्लर रडार बसविण्याबाबत तयारी सुरू झाल्याचे वृत्त आहे. जून २०१५ मध्ये मराठवाड्यात क्लाऊड सीडिंगचा (कृत्रिम पावसाचा प्रयोग) करण्यात आला होता. त्यासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्तालयाच्या चौथ्या मजल्यावर सी-डॉप्लर रडार बसविण्यात आले होेते. २७ कोटींचा खर्च त्यासाठी झाला होता.
पुण्यातील भौतिकशास्त्र तथा हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, मुळात सोलापूरला केंद्र स्थापन करणे हे भौगोलिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारे नाही. १ जूनपासून सोलापूर येथून कृ त्रिम पावसाचा प्रयोग करण्याच्या हालचालींच्या बातम्या येत आहेत, परंतु त्या काळात महाराष्ट्रात ढगांची गर्दी कमी असते. जर ढगांची गर्दी नसेल तर काय करणार, असा प्रश्न आहे. दोन विमाने खरेदी करण्यात येणार आहेत. कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र एका राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असायला हवे.
कायमस्वरूपी केंद्राची शक्यता मावळली
मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग २०१५ मध्ये पहिल्यांदा झाला. सतत पाच वर्षांपासून या भागात दुष्काळी परिस्थिती आहे. कोट्यवधी रुपयांचे दुष्काळी पॅकेज देऊनही प्रश्न पूर्णंत: मिटलेला नाही, त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय सरकाने २०१५ मध्ये घेतला.
प्रयोग यशस्वी झाला तर शासन कृत्रिम पावसासाठी लागणारी महागडी यंत्रणा खरेदी करून औरंगाबाद येथे कायमस्वरूपी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय होणार होता; परंतु गेल्या वर्षी आयुक्तालयावरील सी-डॉप्लर रडार काढून ते हलविण्यात आले. त्यामुळे येथील केंद्र होण्याची शक्यता मावळली होती. ते केंद्र आता सोलापूरमध्ये उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत.
का हवे होते औरंगाबादला केंद्र
औरंगाबाद हे सेंटर कशासाठी निवडले आहे. याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे तत्कालीन संचालक सुहास दिवसे आणि शास्त्रज्ञ आर.व्ही. शर्मा यांनी सांगितले होते की, ३०० ते ४५० कि़ मी. परिसरात येथून मुंबई, पुणे, अकोला, जळगाव-धुळे, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा आणि पूर्ण मराठवाड्यातील परिसरातील दुष्काळग्रस्त भाग यामुळे नियंत्रित होऊ शकतो.