केंद्र सरकार कामगार, शेतकरी विरोधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:02 AM2021-09-05T04:02:27+5:302021-09-05T04:02:27+5:30
वाळूज महानगर : केंद्र शासनाच्या कामगार व शेतकरीविरोधी धोरणामुळे देश संकटात सापडला असून, केवळ बड्या उद्योगपतींचे हित जोपासण्याचे काम ...
वाळूज महानगर : केंद्र शासनाच्या कामगार व शेतकरीविरोधी धोरणामुळे देश संकटात सापडला असून, केवळ बड्या उद्योगपतींचे हित जोपासण्याचे काम सुरू असल्याचा आरोप अ.भा. सिटूचे महासचिव तथा माजी खा. तपन सेन यांनी बजाजनगरात शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
दिवंगत कॉ. उद्धव भवलकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शनिवारी सिटूच्या वतीने बजाजनगर येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कॉ. तपन सेन म्हणाले की, केंद्र सरकारने खाजगीकरणाचा सपाटा लावला असून, मूठभर बड्या काॅर्पोरेट क्षेत्रासाठी हे सरकार काम करीत आहे. बहुमताच्या जोरावर केंद्र सरकारने २९ कामगार कायदे रद्द केले असून, याचा फटका कामगारांना बसत आहे. मोठमोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले जात असून, देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारविरोधात आवाज उठविणाऱ्यांविरुद्ध राष्ट्रद्रोहाचे खटले दाखल केले जात आहेत. देशभरातील ५०० रेल्वेस्टेशन, तसेच २५ विमानतळे बड्या उद्योगपतींच्या हाती देण्याचा सरकारचा डाव असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची विक्री करीत असल्याचा आरोपही कॉ. तपन सेन यांनी केला.
केंद्र सरकारकडून राज्याच्या जीएसटीचा वाटा देण्यास टाळाटाळ केली जात असून, महाराष्ट्राचे २० हजार कोटींचा जीएसटीचा वाटा देण्यात आला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी सिटूचे राज्य सचिव कॉ. एम.एच. शेख, जिल्हा सचिव कॉ. दामोदर मानकापे, कॉ. लक्ष्मण साक्रूडकर, कॉ. अजय भवलकर, कॉ. शंकर ननंनुरे, कॉ. बसवराज पटे, कॉ. सतीश कुलकर्णी, कॉ. मंगल ठोंबरे, कॉ. दीपक अहिरे, नितीन देशमुख, गौतम शिंदे आदींची उपस्थिती होती.
चौकट...............
२५ सप्टेंबर रोजी देशव्यापी संप
सिटूचे राज्याध्यक्ष कॉ. डी.एल. कराड म्हणाले, देशभरात सिटूचे जवळपास १ कोटींवर सभासद असून, सिटूच्या माध्यमातून कामगारांच्या हक्कासाठी अविरतपणे लढा सुरू आहे. केंद्र शासनाच्या कामगार व शेतकरी धोरणाच्या निषेधार्थ २५ सप्टेंबरला देशव्यापी संपाचे आयोजन करण्यात आले असून, या संपात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कॉ. कराड यांनी केले.
फोटो ओळ-
बजाजनगरात अखिल भारतीय सिटूच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना सिटूचे महासचिव कॉ. तपन सेन, तर शेजारी राज्याध्यक्ष डॉ. डी.एल. कराड, कॉ. एम.एच. शेख, कॉ. दामोदर मानकापे, कॉ. लक्ष्मण साक्रूडकर आदी दिसत आहेत.
फोटो क्रमांक- पत्रकार परिषद
----------------------------