छत्रपती संभाजीनगरच्या गणित संशोधकाच्या 'एसएमएस थेअरी'ला केंद्र शासनाचे काॅपी राईट

By राम शिनगारे | Published: December 7, 2023 02:41 PM2023-12-07T14:41:39+5:302023-12-07T14:43:57+5:30

वेळ व किमतीचा अचूक अंदाज आणि माहिती मिळविण्यासाठी गणितात 'एसएमएस थेअरी' (सादिकस् मॅथेमेटिकल सेट-अप) तयार केली आहे.

Central Govt copyright to 'SMS Theory' of math researcher Dr. Sadik Ali Shaikh of Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरच्या गणित संशोधकाच्या 'एसएमएस थेअरी'ला केंद्र शासनाचे काॅपी राईट

छत्रपती संभाजीनगरच्या गणित संशोधकाच्या 'एसएमएस थेअरी'ला केंद्र शासनाचे काॅपी राईट

छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहारात वेळ आणि किंमत अतिशय महत्त्वाची असते. या दोन्ही घटकांवरच व्यवहाराचे यश अवलंबून असते. त्यासाठी मौलाना आझाद महाविद्यालयातील गणित विभागाचे प्रमुख डॉ. सादिक अली शेख यांनी गणितामधील 'एसएमएस थेअरी' मांडली आहे. त्या थेअरीला केंद्र शासनाच्या इन्टेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑफ इंडियातर्फे कॉपी राईटचे अधिकार नुकतेच बहाल केले आहे.

विभागप्रमुख डॉ. सादिक अली शेख यांनी कमोडिटी मार्केट, फॉरेन एक्सचेंज मार्केट, करन्सी मार्केट आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील शेअर मार्केटमध्ये फायनान्शियल असेंटमध्ये वेळ व किमतीचा अचूक अंदाज आणि माहिती मिळविण्यासाठी गणितात 'एसएमएस थेअरी' (सादिकस् मॅथेमेटिकल सेट-अप) तयार केली. किंमत व वेळ या दोघांचा आलेख समजून घेण्यासाठी गणितात कॅल्क्युलस शाखा काम करते. त्याचा वापर करून एमएमएस थेअरीची संकल्पना मांडली. ही थेअरी नॉन डिफरन्सिबल फंक्शन, नॉन कंटिन्युअस फंक्शनचा आधार घेत किंमत आणि वेळेच्या आलेखाला अतिशय सूक्ष्म पद्धतीने समजून घेते. तसेच त्याची संभाव्य दिशा ठरविण्याचा प्रयत्न करते. या थेअरीमध्ये एसएमआयएलई, एफआरओआर, जीआरओआर, एसएमडी आणि सीवायसीएलईएस या नवीन व अनोख्या गणितीय संकल्पनाही मांडल्या आहेत. त्यामुळे थेअरीचा विविध आर्थिक कंपन्या, संस्था, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार फायनान्शियल मार्केटमधील विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी थेअरीचा अभ्यासक्रमांमध्ये समावेश करता येईल, अशी माहिती संशोधक डॉ. सादिक अली शेख यांनी दिली. या यशाबद्दल त्यांचे मौलाना आझाद शिक्षण संस्थाचे अध्यक्ष फरहात जमाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मजहर फारुकी यांनी अभिनंदन केले.

एका व्याख्येवर १५ देशात संशोधन
डॉ. सादीक अली शेख यांनी २०१८ मध्ये 'सादिक ट्रान्सफॉर्म' नावाच्या नवीन ट्रान्सफाॅर्मची व्याख्या मांडली होती. हे संशोधन मार्च २०१९ मध्ये अमेरिकेतील एका रिसर्च नियकालिकामध्ये प्रसिद्ध झाले. सध्या अस्तित्वात असलेल्या इंटिग्रल ट्रान्सफाॅर्म जे टाईम डोमेनला फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये कन्व्हर्ट करतात. त्या सर्व इंटिग्रल ट्रान्सफाॅर्मचे युनिफिकेशन म्हणजेच 'सादिक ट्रान्सफाॅर्म'. अभियांत्रिकी शाखांमध्ये उद्भवणारे क्लिष्ट ॲनालिसिस व्यवस्थित अभ्यासण्यासाठी सादिक ट्रान्सफॉर्म महत्त्वाचे ठरत आहे. सध्या या व्याख्येवरच विद्यापीठात दोन विद्यार्थ्यांनी पीएच.डी.पूर्ण केली असून, चीन, थायलंड, इराक, इराण, मलेशियासह इतर १५ देशातील प्राध्यापक आणि गणिताचे संशोधक सादिक ट्रान्सफाॅर्मचा वापर संशोधनासाठी करीत आहे. या संशोधनावर डॉ. शेख यांना युएई येथील शारजा विद्यापीठात व्याख्यान देण्यासाठी बोलावण्यात आले होते.

Web Title: Central Govt copyright to 'SMS Theory' of math researcher Dr. Sadik Ali Shaikh of Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.