११ विद्यार्थ्यांवरच चालते केंद्रीय शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:49 PM2017-10-04T23:49:02+5:302017-10-04T23:49:02+5:30
वसमत येथील जिल्हा परिषदेची केंद्रीय नूतन शाळेत पाच वर्गात फक्त ११ मुलांचा प्रवेश आहे. त्यातील शाळेत फक्त ३ मुलेच मंगळवारी पहावयास मिळाली. पाच वर्ग शिक्षकसंख्या ३ व विद्यार्थी हजर फक्त ३ अशी विचित्र अवस्थेत वसमत शहरातील ही केंद्रीय शाळा चालत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : वसमत येथील जिल्हा परिषदेची केंद्रीय नूतन शाळेत पाच वर्गात फक्त ११ मुलांचा प्रवेश आहे. त्यातील शाळेत फक्त ३ मुलेच मंगळवारी पहावयास मिळाली. पाच वर्ग शिक्षकसंख्या ३ व विद्यार्थी हजर फक्त ३ अशी विचित्र अवस्थेत वसमत शहरातील ही केंद्रीय शाळा चालत आहे.
वसमत तालुक्यात जिल्हा परिषद शाळांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत आहे. एकीकडे डीजीटल शाळा करण्यावर भर दिला जात आहे. तर दुसरीकडे डिजिटल शाळांत शिक्षक मोबाईलवर व्यस्त झाल्याचेही चित्र आहे. ९० टक्के शिक्षक अपडावून करत असल्याने शिक्षणाचा बट्याबोळ होत आहे. शिक्षकांच्या अपडावूनवर अनेक शाळांचे वेळापत्रक ठरत असते. त्याला सुधारण्याची तसदी कोणी घेताना दिसत नाही.
वसमत शहरात जिल्हा परिषदेची नूतन केंद्रीय शाळा आहे. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत ही शाळा आहे. या शाळेत तीन शिक्षकही तैनात आहेत. शहरात मुख्य रस्त्यावर सुसज्ज इमारतीत ही शाळा आहे. मात्र या शाळेचा हजेरीपट पाहिला तर फक्त ११ विद्यार्थी या शाळेत आहेत हे पहावयास मिळते. त्यात इयत्ता पहिलीला १, दुसरी २, तिसरीला ३, चौथीला १ तर पाचवीला ५ जणांचा प्रवेश असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
सदर प्रतिनिधीने शाळेला भेट दिली असता एका वर्गात ३ विद्यार्थी आढळले. त्यांना विचारले असता त्यातील एक पाचवीचा एक तिसरीचा तर दुसरीचा विद्यार्थी होता. त्या तिघांना एकत्र बसवून एक शिक्षिका शिकवण्याचे काम करत होत्या. फक्त ३ विद्यार्थ्यांवर ही शाळा चालत असल्याचा धक्कादायक प्रकार पहावयास मिळाला. आता या शाळेत शिक्षक कसे शिकवत असतील व विद्यार्थी कसे घडत असतील, हा शोधाचाच विषय आहे.