केंद्रीय पथक हजार मैलांवरून आले; पाच मिनिटे पाहून गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:48 PM2019-11-23T12:48:13+5:302019-11-23T12:51:30+5:30
बियाणे, खतांचा खर्च तातडीने देण्याची शेतकऱ्यांची मागणी
औरंगाबाद : दिल्ली ते औरंगाबादपर्यंतचा हजार मैलांचा प्रवास करून जिल्ह्यातील औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड आणि कन्नड या तालुक्यांतील १५ गावांतील ओल्या दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने ८ गावांतील शेतकऱ्यांशी काही मिनिटांचा संवाद साधून ओल्या दुष्काळाच्या व्यथा समजून घेतल्या. १२५ कि.मी.च्या अंतरातील दौरा पाच तासांतच उरकून पथकातील अधिकाऱ्यांनी औरंगाबाद गाठले. दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सुभेदारीऐवजी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसोबत वाद घातल्यानंतर शुक्रवारी धावती भेट देऊन ओला दुष्काळ पाहिला.
पाहणी पथकात केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव डॉ.वी.तिरुपगल, डॉ. के. मनोहरण, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जि.प.सीईओ पवनीत कौर, जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम मोटे, फुलंब्रीचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, सिल्लोडचे ब्रिजेश पाटील, कन्नडचे जनार्दन विधाते यांच्यासह इतर संबंधित अधिकारी पथकासोबत होते.
आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. २२ दिवसांच्या सततच्या पावसामुळे पिके सडली. सडलेली पिके खाल्ल्याने जनावरे दगावली. सगळे काही उद्ध्वस्त झाल्यासारखे आहे. रबी हंगामाला सामोरे जाण्याची ताकद शेतकऱ्यांत राहिलेली नाही. त्यामुळे शासनाने किमान बियाणे आणि खतांसाठी लागणारा खर्च तातडीने देण्याची मागणी शुक्रवारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांकडे केली. अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिके हिरावून नेली. त्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने केले असून, त्याची प्रत्यक्ष पाहणी करून केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यासाठी केंद्रीय कृषी विभागाचे पथक २२ नोव्हेंबरपासून मराठवाड्यात पाहणी करणार आहे. दौऱ्यापूर्वी विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी पथकाला विभागातील नुकसानीचे सादरीकरण केले.
या गावांतील ओला दुष्काळ पाहिला
फुलंब्री तालुक्यातील चौका येथून पाहणी सुरू केली. कांचनबाई नाना वाघ यांच्या दीड एकर शेतातील मका पिकाचे नुकसान पथक प्रमुखांनी पाहिले. त्या शेतात अजूनही पावसाचे पाणी साचलेले आहे. वाघ यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या, झालेले नुकसान पाहून पथक पाल या गावाकडे गेले. त्या गावातील कृष्णा जाधव या शेतकऱ्याने सांगितले की, अवकाळी पावसामुळे एका एकरातील उभे पीक हातचे गेले असून, ज्या कपाशीला ५० रु. किलो भाव मिळतो तेथे आज नाईलाजाने आम्हाला १० ते १५ रुपये किलो भावात विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट उभे आहे. पीक विम्याबाबतच्या अडचणी त्यांनी मांडल्या. परंतु भाषेच्या अडचणीमुळे पथक प्रमुखांना त्याचे गांभीर्य लक्षात आले नाही.
पाथ्री येथील मंदाकिनी पाथ्रीकर व इतर शेतकऱ्यांच्या शेतातील कापसाचे पीक पूर्णत: नष्ट झाल्याचे पथकाला सांगण्यात आले. त्यानंतर सिल्लोड तालुक्यातील गेवराई सेमी येथील कडुबा ताठे, माणिकराव ताठे, साहेबराव ताठे, मुरलीधर कापडे या शेतकऱ्यांशी अधिकाऱ्यांनी संवाद साधला. निल्लोड येथील पांडुरंग आहेर यांच्या मका, सोयाबीन, कापूस पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाल्याचे त्यांनी पथकाला सांगितले. वांजोळा गावातील विष्णू पंडित या शेतकऱ्याच्या सहा एकर शेतातील मका, कापूस ही दोन्ही पिके शंभर टक्के वाया गेली. मक्याच्या दुबार पेरणीवर रोग पडल्याने मका खराब झाल्याचे पंडित यांनी यावेळी सांगितले. धानोरा गावातील सुभाष बमनावत यांच्या दीड एकरातील दोन लाख खर्च करून लागवड केलेल्या अद्रक पिकावर रोग पडल्याने संपूर्ण अद्रकचे पीक खराब झाले असून, संपूर्ण गावात हीच परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.
भराडीतील शिवाजी खोमणे या शेतकऱ्याने सांगितले की, २२ दिवस सतत पाऊस झाल्याने दोन एकरातील मका पूर्णत: पाण्यात भिजून खराब झाली. सडलेली मका जनावरांनी खाल्ल्याने तीही मरण पावल्याचे यावेळी शेतकऱ्याने सांगितले. कन्नड तालुक्यातील आडगाव पिशोर येथील गेणूबाई भिवान भोसले यांच्या बत्तीस गुंठे शेतात मका आणि कपाशी होती, पण एक महिन्यापासून शेतात पाणी साचले आहे. पाणी आटण्यासाठी अजून एक महिना लागणार आहे. शेतातील पूर्ण पीक हातचे गेले असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. नाचनवेल येथील राधाबाई राजपूत यांच्या दोन एकर शेतातील कापूस पूर्ण वाया गेला असून, किमान बी-बियाणांचा आणि खताचा खर्च सरकारने द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच कोपरवेल येथील शिवाजी धुमाळ यांनी एक एकर मक्याचे पूर्ण नुकसान झाले असून, दहा दिवस पाऊस होता. आता आम्ही काय करावं, काही सूचत नाही, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
भाषेची अडचण; गावे, तालुक्यांत गेलेच नाहीत
पथकप्रमुखांना मराठी भाषेतून व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे कळत नव्हते. त्यामुळे भाषा दुभाषकांची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक ठिकाणी पथक गेले नाही, त्यामुळे तेथे सकाळपासून उपस्थित राहिलेले महसूल कर्मचारी, शेतकरी यांचा भ्रमनिरास झाला.४दौऱ्यात नियोजनात असलेली गावे सोडून दुसऱ्याच सोयीच्या गावांतील शेतकऱ्यांचे पथकाने संवाद साधून दुष्काळ समजून घेतला. सोयगाव, सिल्लोड तालुक्यांतील १०० टक्के नुकसान झालेले असताना पथकाने त्या तालुक्यांचा फक्त धावता आढावा घेतला.