केंद्रीय पथक शहरात दाखल, गोपनीय पद्धतीने स्वच्छ सर्वेक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:03 AM2021-01-14T04:03:56+5:302021-01-14T04:03:56+5:30
औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहराने कोण कोणती तयारी केली याची पाहणी करण्यासाठी मंगळवारी केंद्रीय पथक शहरात दाखल झाले. ...
औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहराने कोण कोणती तयारी केली याची पाहणी करण्यासाठी मंगळवारी केंद्रीय पथक शहरात दाखल झाले. या पथकाने आपले कामही सुरू केले. मात्र महापालिकेकडून याची प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार पथकाने ठिकठिकाणी पाहणी दौरा सुरू केला. गुरुवारी आणखी एक जण पथकात सहभागी होणार आहे.
केंद्र शासनाने देशातील प्रमुख शहरे स्वच्छ आणि सुंदर व्हावीत या उद्देशाने ६ वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली. अभियानात गेल्यावर्षी औरंगाबाद शहराची रँकिंग पूर्वीच्या तुलनेत सुधारली. मागील वर्षी महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणासाठी जोरदार तयारी केली होती. यंदा महापालिकेकडून पाहिजे तशी तयारी करण्यात आलेली नाही. आपले पितळ उघडे पडेल अशी भीती महापालिकेला वाटत आहे. मागील आठ दिवसांपासून केंद्र शासनाचे प्रथम कधी येणार अशी विचारणा माध्यमांकडून वारंवार घनकचरा विभागाला करण्यात येत होती. मात्र केंद्र शासनाकडून यासंदर्भात कोणतेही पत्र आले नसल्याचे सांगण्यात आले. दरवर्षी डिसेंबर अखेर किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पथक शहरात दाखल होत असते. मंगळवारी केंद्र शासनाने नेमलेल्या पथकातील कर्मचारी महापालिकेत दाखल झाले. त्यानंतर पथकाने महापालिकेच्या घनकचरा विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने कामाला सुरुवात केली.
पथकाने पहिल्या दिवशी काय काय बघितले
पहिल्या दिवशी खडकेश्वर येथील रस्ता, या भागातील व्यापाऱ्यांकडे कचरा टाकण्यासाठी कोणत्या सुविधा आहेत. साफ सफाई कशी आहे, याची पाहणी केली. मिलिंद महाविद्यालय परिसर, जुन्या शहरातील बुढीलेन परिसरातील वसाहतीत जाऊन पाहणी केली. हर्सुल येथे शौचालये आणि मध्यवर्ती जकात नाक्यासह मध्यवर्ती बस स्थानकातील सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली. चौधरी कॉलनी, मिसारवाडी, आरतीनगर, जयसिंगपुरा आदी भागात पथकाने पाहणी केली.
तीन वर्षांपूर्वी स्वीकारली होती लाच
केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या पाहण्यासाठी खाजगी संस्थेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पथकातील कर्मचाऱ्यांना तीन वर्षांपूर्वी महापालिकेने लाच घेताना रंगेहात पकडले सुद्धा होते. आता महापालिकेकडून पथकाबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे.