केंद्र सरकारने राबविल्या लोकोपयोगी योजना
By Admin | Published: June 15, 2017 11:26 PM2017-06-15T23:26:15+5:302017-06-15T23:32:53+5:30
परभणी : केंद्र शासनाच्या तीन वर्षांच्या कालावधीत विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात आल्या असून, त्याचा जनतेला चांगला लाभ झाला असल्याची माहिती भाजपाचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी दिली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : केंद्र शासनाच्या तीन वर्षांच्या कालावधीत विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात आल्या असून, त्याचा जनतेला चांगला लाभ झाला असल्याची माहिती भाजपाचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली़
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी भाजपाच्या वतीने गुरुवारी परभणीत पत्रकार परिषद घेण्यात आली़
प्रवक्ते शिरीष बोराळकर म्हणाले की, जनधन योजनेंतर्गत ज्यांचे कधीही बँकेत खाते नव्हते, त्यांचे बँकेत खाते उघडून त्यामधून ६५ हजार कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाले आहेत़ जन सुरक्षा योजनेंतर्गत साडेतेरा कोटी लोकांचा विमा काढण्यात आला असून, मुद्रा योजनेंतर्गत साडेसात कोटी लोकांना ३२ हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे़ उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत अडीच कोटी घरांमध्ये गॅस देण्यात आला आहे़ केंद्र शासनाने जनहिताचे अनेक निर्णय घेतले आहे़ याशिवाय राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेही शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचे ते म्हणाले़
यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, संजय शेळके, मीना परतानी, सुधीर कांबळे, मोहन कुलकर्णी, दिनेश नरवाडकर, मधुकर गव्हाणे, प्रशांत साबळे आदींची उपस्थिती होती़