‘सीईओ’ आर्दड यांचा औरंगाबादमधील २0 महिन्यांचा कार्यकाळ गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 05:41 PM2018-04-17T17:41:18+5:302018-04-17T17:43:56+5:30

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांची अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. परवीन कौर या औरंगाबाद जि.प.च्या ‘सीईओ’ म्हणून त्यांची जागा घेतील.  

'CEO' Ardad got 20 months of work in Aurangabad | ‘सीईओ’ आर्दड यांचा औरंगाबादमधील २0 महिन्यांचा कार्यकाळ गाजला

‘सीईओ’ आर्दड यांचा औरंगाबादमधील २0 महिन्यांचा कार्यकाळ गाजला

googlenewsNext
ठळक मुद्देमधुकरराजे आर्दड यांनी १ आॅगस्ट २०१६ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे घेतली होती. १ वर्ष ८ महिन्यांच्या त्यांच्या सेवा काळात त्यांनी अथक परिश्रम घेऊन जिल्ह्यास हगणदारीमुक्त केले.

औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांची अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. परवीन कौर या औरंगाबाद जि.प.च्या ‘सीईओ’ म्हणून त्यांची जागा घेतील.  

मधुकरराजे आर्दड यांनी १ आॅगस्ट २०१६ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे घेतली होती. १ वर्ष ८ महिन्यांच्या त्यांच्या सेवा काळात त्यांनी अथक परिश्रम घेऊन जिल्ह्यास हगणदारीमुक्त केले. चुकीची कामे करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर त्यांचा धाक असून, वेळप्रसंगी त्यांनी पदाधिकाऱ्यांचा विरोधही पत्करला. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. अविश्वासाच्या बाजूने आवश्यक सदस्यांची जमवाजमव करण्यासाठी भाजप सदस्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न झाला होता; परंतु भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने खेळी केल्यामुळे ऐनवेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या सांगण्यावरून भाजप सदस्यांनी ‘यू टर्न’ घेतला आणि अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली थांबल्या. 

आर्दड यांनी शिक्षण विभागातील अपंग समावेशित युनिट पुनर्स्थापनेत झालेल्या घोटाळ्यामध्ये त्यांनी तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर व कनिष्ठ प्रशासन अधिकारी संजीव काळम पाटील या दोघांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा धाडसी निर्णय घेतला असून, याच प्रकरणातील ११ विशेष शिक्षकांच्या सेवा पुनर्स्थापना आदेशाला स्थगितीही दिली. टंचाईच्या काळातील पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात आलेल्या टँकर पुरवठा कंत्राटदाराचे बिल काढण्यावरूनही जि.प. अध्यक्ष व आर्दड यांच्यात वितुष्ट आले होते; परंतु शासन आदेशानुसार टँकर पुरवठादाराचे बिल काढावेच लागणार, या मतावर आर्दड शेवटपर्यंत ठाम राहिले आणि त्यांनी ते बिल अदा केले. दरम्यान, आर्दड यांच्या जागी परवीन कौर यांची मुख्य कार्यकारीपदी नियुक्ती झाली आहे. कौर याआधी जव्हार येथे आदिवासी विकास विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

चुकीच्या बदलीमुळे नाराजी
मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड हे बदलीच्या प्रयत्नात होतेच. जिल्हाधिकारी म्हणून कोणत्याही जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची त्यांची तयारी होती; परंतु शासनाने त्यांची ऐनवेळी अहमदनगर येथील मनपा आयुक्तपदी बदली केल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली. त्यांनी यापूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त, हिंगोली जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कर्तव्य बजावलेले होते. त्यामुळे औरंगाबाद जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारीपदानंतर जिल्हाधिकारी म्हणून आपली बदली होईल, अशी त्यांना अपेक्षा होती. यासाठी आवश्यक असलेले मसुरी येथील प्रशिक्षणही सलग दोनवेळा घेतले. 

Web Title: 'CEO' Ardad got 20 months of work in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.