सीईओ, शिक्षणाधिकारी यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:05 AM2021-06-20T04:05:06+5:302021-06-20T04:05:06+5:30
औरंगाबाद : कल्पक उपक्रम आणि कोरोना काळात केलेल्या चांगल्या कामाची दखल घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश ...
औरंगाबाद : कल्पक उपक्रम आणि कोरोना काळात केलेल्या चांगल्या कामाची दखल घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले आणि शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांचा विश्व फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीने हृद्य सत्कार करण्यात आला.
कन्नडचे माजी आ. किशोर पाटील, महामंडळाचे राज्य सरचिटणीस एस. पी. जवळकर व विभागीय सचिव वाल्मीक सुरासे, राजेंद्र खंडेलवाल, मिर्झा सलीम बेग, योगेश पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी अप्पासाहेब चाटे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जवळकर म्हणाले, डॉ. गोंदावले हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाल्यापासून त्यांनी अनेक कल्पक उपक्रम जिल्ह्यामध्ये राबवले. झकास पठार, डिजिटल स्कूल अशा बऱ्याच योजना त्यांनी राबवल्या. त्यामुळे महामंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. तर येत्या ३० जूनला शिक्षणाधिकारी प्राथमिक सूरजप्रसाद जयस्वाल हे सेवानिवृत्त होत असून त्यांनीही आपल्या काळात शिक्षणाभिमुख अनेक स्तुत्य उपक्रम घेतले त्यामुळे विश्व फाउंडेशनच्या वतीने त्यांना सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.
माजी आ. पाटील म्हणाले, डॉ. गोंदावले यांनी शिक्षणाधिकारी व शिक्षक यांना सोबत घेऊन वाळूज परिसरात कोरोना काळात उत्तम काम केले. सीएसआरमधून शाळा डिजिटल केल्या. त्यांनी कायमस्वरूपी विद्यार्थी उपयोगी उपक्रम धावपळ करून राबवत राहिले. त्यामुळे विश्व फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांच्या वतीने त्यांना आणि सेवा गौरव देऊन सन्मानित करत आहोत. सत्काराला उत्तर देताना मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी विश्व फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे आभार मानले.