सीईओ म्हणाले, पोलिस बोलावणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:02 AM2017-09-23T01:02:42+5:302017-09-23T01:02:42+5:30
परिस्थिती येईल तेव्हाही पोलीस बोलावणारच, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांना दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा परिषदेत जेव्हा केव्हा वित्त किंवा जीवित हानी होण्याची शक्यता असते, अशा वेळी पोलीस बोलावण्याची सतर्कता बाळगावीच लागते. मी त्या दिवशी पोलीस बोलावले होते व यापुढे अशी परिस्थिती येईल तेव्हाही पोलीस बोलावणारच, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांना दिला.
जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी दुपारी स्थायी समितीची बैठक सुरू झाली. सुरुवातीलाच अविनाश पाटील गलांडे, किशोर बलांडे, रमेश गायकवाड यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला की, दलित वस्ती सुधार योजनेच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यतेसाठी आम्हाला आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, यासंदर्भात आम्ही १ सप्टेंबर रोजी लोकशाही मार्गाने मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दालनासमोर आंदोलन केले. नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांनी दालनाबाहेर येऊन आंदोलनकर्त्या सदस्यांसोबत संवाद साधला. त्यानंतर आम्ही निघालो तेव्हा पोलिसांनी तुम्हाला अटक करीत आहोत, गाडीत बसा, असा दम दिला. आम्ही अतिरेकी आहोत का, जिल्हा परिषदेत पोलिसांना बोलावून मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी काय साध्य केले?
यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांनी सभागृहासमोर सविस्तर निवेदन केले. ते म्हणाले की, तुम्ही माझ्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करणार आहात याची पूर्वकल्पना दिलेली नव्हती. अचानकपणे माझ्या दालनासमोर तुम्ही आंदोलन सुरू करून ज्या पद्धतीच्या असंविधानिक घोषणा दिल्या, त्या न पटणाºया होत्या. त्यामुळे वातावरण बिघडू शकते, अशी माझी धारणा झाल्यामुळे मी पोलिसांना बोलावले. जेव्हा केव्हा जिल्हा परिषदेत अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते तेव्हा पोलिसांना बोलवावेच लागते. मी ‘आयएएस’ अधिकारी आहे. यापूर्वी मी दंडाधिकारीय कामगिरी व्यवस्थितपणे सांभाळलेली आहे. त्यामुळे मला कायदा व सुव्यवस्था कशी हाताळावी लागते, याचे ज्ञान आहे. यापुढेही जिल्हा परिषदेत अशा प्रकारची घटना घडली, तर पोलिसांना नक्कीच बोलावले जाईल.
त्यानंतर किशोर बलांडे म्हणाले की, आम्ही आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांना जिल्हा परिषदेत बोलावले होते. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड म्हणाले की, जेव्हा घोषणाबाजी सुरू झाली, त्याचवेळी मी पोलिसांना बोलावले होते. उपाध्यक्ष केशव तायडे म्हणाले की, जिल्हा परिषदेत पोलिसांना बोलावले, ही निंदनीय घटना आहे. आंदोलनाच्या वेळी अध्यक्ष आणि मी त्यांच्या दालनात बसलेलो होतो. सर्व प्रकरण मिटल्यानंतरही पोलीस त्यांच्या गाडीत बसवून जि.प. सदस्यांना ठाण्यात घेऊन जातात.
पोलिसांना बोलावण्यापूर्वी तुम्ही आम्हाला सांगायला हवे होते. सर्वांचे बोलणे ऐकून घेतल्यानंतर अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर म्हणाल्या की, यापुढे जिल्हा परिषदेत असे काही होणार नाही. यासाठी दोन्ही बाजंूनी हे प्रकरण येथेच मिटवा. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे प्रशासनाच्या रथाची दोन चाके आहेत. ही दोन्ही चाके सोबत चालली, तर प्रशासनाचा गाडा सुरळीत चालेल. त्यामुळे हा वाद आता येथेच मिटलेला बरा.