सीईओंनी घेतली बीढडीओवरील आरोपांची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:03 AM2021-06-05T04:03:56+5:302021-06-05T04:03:56+5:30
कन्नड : पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) डॉ. श्रीकृष्ण वेणीकर यांच्याविरुद्ध विविध आरोप करून पंचायत समितीच्या मासिक बैठकीत कार्यमुक्तीचा ...
कन्नड : पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) डॉ. श्रीकृष्ण वेणीकर यांच्याविरुद्ध विविध आरोप करून पंचायत समितीच्या मासिक बैठकीत कार्यमुक्तीचा ठराव घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने शुक्रवारी जिल्हा परिषदेचे सीईओ मंगेश गोंदावले यांनी कन्नड पंचायत समितीचा दौरा करत पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांबाबत झाडाझडती घेत काही सूचना केल्या. यादरम्यान पंचायत समितीचे पदाधिकारी आणि बीडीओ यांच्यात ताणल्या गेलेल्या संबंधामुळे सीईओच्या उपस्थितीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून कार्यालयाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गेल्या दोन वर्षांत मनरेगाअंतर्गत एकाही वैयक्तिक सिंचन विहिरीला मान्यता देण्यात आली नाही. या कामाबाबत बीडीओ उदासीन असून, ९० टक्के ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने कामांना अडचणी येतात. ग्रामसेवकांच्या बदल्या करताना सभापती, उपसभापती आणि सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही, असे अनेक आरोप करण्यात आले होते.
शुकवारी सीईओ गोंदावले आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा) केंद्रेकर यांनी पंचायत समितीस भेट देऊन बीडीओ डॉ. श्रीकृष्ण वेणीकर यांच्याकडून त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत वस्तुस्थिती जाणून घेतली.
मनरेगाअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरीच्या लाभासाठी दाखल संचिकेतील त्रुटींची पूर्तता करून घेऊन विस्तार अधिकाऱ्यामार्फत तपासणी व स्थळ पाहणी सात दिवसांत करून घ्यावी. पात्र लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार लाभ देण्याची सूचना केली, अशी माहिती बीडीओ वेणीकर यांनी दिली.
आरोपांबाबत सीईओ यांनी बीडीओ आणि पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत वेगवेगळी चर्चा करून आमची बाजू ऐकून घेतली, असे सभापती अप्पाराव घुगे यांनी सांगितले.
- फोटो :
पंचायत समितीच्या आवारात पोलीस बंदोबस्त.
040621\img_20210604_124649_1.jpg
- फोटो : पंचायत समितीच्या आवारात पोलीस बंदोबस्त