अयोध्येत सोहळा, सर्वत्र 'राममय' वातावरण; पोस्टाच्या रामायणावरील तिकिटाच्या स्मृती उजागर
By प्रशांत तेलवाडकर | Published: January 16, 2024 12:09 PM2024-01-16T12:09:41+5:302024-01-16T12:13:33+5:30
भारतीय पोस्ट विभागाने २२ सप्टेंबर २०१७ या दिवशी ‘रामायणावर’ आधारित प्रकाशित केलेले एकत्रित मिनिचेयर शीट.
छत्रपती संभाजीनगर : अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना निमित्त देशभरात ‘राममय’ वातावरण निर्माण झाले आहे. कोणी अखंड ‘रामनाम’ जप करीत आहे, तर कोणी त्यांच्याकडील ‘श्रीराम दरबार’ची प्राचीन नाणी दाखवत आहे. भारतीय डाक विभागाने तर ७ वर्षांपूर्वीच तिकीट व पाकिटावर ‘रामायण’ साकारून शंखनाद केला होता. तिकिटांचे संग्राहक सुधीर कोर्टीकर यांनी अशा ११ तिकिटांचा संग्रह करून ठेवला आहे. खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी त्यांनी हा दुर्मीळ खजिना खुला केला आहे.
११ तिकिटे, पाकिटांचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन
पवित्र ग्रंथ ‘रामायण’वर आधारित भारतीय डाक विभागाने पोस्ट तिकिटे व पाकिटाचे प्रकाशन २२ सप्टेंबर २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील वाराणसीत तुलसी आश्रम मंदिरात करण्यात आले होते.
रामायणातील ११ प्रसंग
भारतीय डाक विभागाने रामायणातील ११ प्रसंग निवडून ते तिकिटावर साकारले. यात राम-सीता स्वयंवर, राम वनवास, केवट संवाद, भरत भेट, श्रीरामाने शबरीकडून उष्टे बोर खाणे, सीतादेवीच्या शोधात जटायूशी भेट, रावणाशी युद्धासाठी लंकामध्ये जाण्याकरिता समुद्रावर सेतू तयार करणे, अशोक वाटिकेमध्ये माता सीतेला श्रीरामाचा संदेश पोहोचविणारा हनुमान, लक्ष्मणाला वाचविण्यासाठी हनुमानाने संजीवनी बुटी आणण्याचा प्रसंग, रावण वध व श्रीरामाचा राज्याभिषेक, असे ११ प्रसंग त्यात नमूद करण्यात आले आहेत.
७ लाख तिकिटे विक्री
भारतीय डाक विभागाने ३ लाख मिनियेचर प्रिंटेड शीट्स (११ तिकिटांचे एक शीट) व ७ लाख मुद्रित शीटलेट्स (तिकीट) प्रकाशित केले होते व अल्पावधीत त्यांची विक्री झाली होती. अवघ्या ६५ रुपयांत ११ तिकिटांचा संच मिळत होता. यास प्रथम दिवस आवरण/ विवरणिका असे म्हटले जाते. प्रासंगिक असल्याने त्यानंतर या तिकिटे व पाकिटांची छपाई करण्यात आली नाही.
रामायणाचे पोस्ट तिकीट आता दुर्मीळ
मला पोस्टाचे तिकीट जमा करण्याचा छंद आहे. भारतीय डाक विभाग असे प्रसंगानुसार एकदाच तिकीट प्रकाशित करत असतो. प्रासंगिक असल्याने त्यानंतर पोस्टाने तिकीट पुनर्प्रकाशित केले नाही. यामुळे ही तिकिटे दुर्मीळ आहेत.
- सुधीर कोर्टीकर, तिकीट संग्राहक