लस न घेताच १६ जणांना प्रमाणपत्र; महापालिकेच्या कोरोना लसीकरणात महाघोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 12:05 PM2021-08-30T12:05:44+5:302021-08-30T12:17:52+5:30

corona vaccination scam in Aurangabad Municipality : ज्या १६ नागरिकांची नोंद लस दिली म्हणून केली ते नागरिक सकाळपासून लसीकरण केंद्राकडे फिरकलेच नव्हते.

Certificate to 16 persons without vaccination;corona vaccination scam in Aurangabad Municipality | लस न घेताच १६ जणांना प्रमाणपत्र; महापालिकेच्या कोरोना लसीकरणात महाघोटाळा

लस न घेताच १६ जणांना प्रमाणपत्र; महापालिकेच्या कोरोना लसीकरणात महाघोटाळा

googlenewsNext
ठळक मुद्देशनिवारी सकाळी १०.१० वाजेच्या सुमारास तेथे ५५ नागरिक रांगेत उभे होते. प्रत्येक नागरिकाच्या लसीकरणाची ऑनलाईन नोंदही घेण्यात येत होती. दुपारी १२ ते १ यावेळेत अचानक आणखी १६ नागरिकांची नोंद सर्व्हरवर दिसून आली

औरंगाबाद : पहाडसिंगपुरा रोडवरील डीकेएमएम महाविद्यालयात असलेल्या महापालिकेच्या लसीकरण केंद्रात मोठा घोटाळा झाल्याचे शनिवारी उशिरा उघडकीस आले. केंद्रावरील मनपाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी तब्बल १६ नागरिकांना लस न देताच प्रमाणपत्र वाटप केले. आरोग्य विभागाने त्वरित ते लसीकरण केंद्र बंद केले असून रात्री उशिरा बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी मनपाच्या आरोग्य विभागानेही स्वतंत्रपणे चौकशी सुरू केली आहे. ( Certificate to 16 persons without vaccination in Aurangabad )

महापालिकेकडे सध्या मुबलक प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शहरात ६० ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मकबऱ्याच्या पाठीमागे पहाडसिंगपुरा रोडवर डीकेएमएम महाविद्यालयात काही दिवसांपूर्वीच केंद्र सुरू केले होते. परिसरातील नागरिक लस घेण्यासाठी तेथे मोठ्या संख्येने येतात. शनिवारी सकाळी १०.१० वाजेच्या सुमारास तेथे ५५ नागरिक रांगेत उभे होते. सर्वांना ५५ टोकन देण्यात आले. शिस्तीत नागरिकांनी लसही घेतली. प्रत्येक नागरिकाच्या लसीकरणाची ऑनलाईन नोंदही घेण्यात येत होती. दुपारी १२ ते १ यावेळेत अचानक आणखी १६ नागरिकांची नोंद सर्व्हरवर दिसून येत होती. लसीकरण केंद्रावरील एका कर्मचाऱ्याने हा धक्कादायक प्रकार त्वरित ‘वॉर रुम’ला कळविला. तातडीने ‘वॉर रुम’चे कर्मचारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्र गाठले. ज्या १६ नागरिकांची नोंद लस दिली म्हणून केली ते नागरिक सकाळपासून तिकडे फिरकलेच नव्हते. वरिष्ठांनी त्वरित लसीकरण केंद्र बंद करून सर्व साहित्य ताब्यात घेतले. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन रात्री बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली; मात्र आमच्याकडे कोणतीही तक्रार आली नसल्याचे बेगमपुरा पोलिसांनी सांगितले. महापालिकेच्या आरोग्य विभागानेही या प्रकरणी स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे.

सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर भावाने केला अत्याचार; प्रसूतीदरम्यान विधवेचा बनाव उघडकीस आल्याने वाचा फुटली

१६ नागरिक नॉट रिचेबल
महापालिकेच्या आरोग्य विभागातील तज्ज्ञ कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन सर्व्हरवरून संशयित १६ नागरिकांचे नाव, पत्ता, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक काढले. त्यांना फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाईल बंद होते. त्यातील एका महिलेने मोबाईल उचलला. लसीकरणाचा विषय काढताच तिनेही मोबाईल बंद केला.

पर्सनल लॅपटॉपचा वापर
लसीकरण केंद्रावर मागील काही दिवसांपासून ऑनलाईन नोंदणीसाठी एक कर्मचारी आपला पर्सनल लॅपटॉप वापरत होता. शनिवारी त्याचा लॅपटॉप खराब झाल्याने त्याने दुसरा लॅपटॉप वापरला. त्यामुळे हे बिंग फुटल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्या १६ जणांना बोगस प्रमाणपत्र मोबाईलवर गेले ते प्रमाणपत्र पुणे येथून रद्द करण्याची प्रक्रियाही महापालिका प्रशासनाने सुरू केली.

Web Title: Certificate to 16 persons without vaccination;corona vaccination scam in Aurangabad Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.