एकाच व्यक्तिला दोन वेगवेगळ्या लसीचे प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:02 AM2021-06-18T04:02:01+5:302021-06-18T04:02:01+5:30
जयेश निरपळ गंगापूर : सर्वत्र हाहाकार निर्माण केलेल्या कोरोनाला हरवण्यासाठी शासनाच्यावतीने लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांना दोन ...
जयेश निरपळ
गंगापूर : सर्वत्र हाहाकार निर्माण केलेल्या कोरोनाला हरवण्यासाठी शासनाच्यावतीने लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांना दोन डोस घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यात दोन्ही डोस हे एकाच कंपनीच्या लसीचे घेणं आवश्यक आहे; मात्र येथील उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांना दोन वेगवेगळ्या लसीचे डोस दिल्याचे समोर आले आहे. ऑनलाइन नोंदणीत घोळ झाला असून, प्रत्यक्षात एकाच लसीचे डोस दिले असल्याचे रुग्णालयांकडून स्पष्ट करण्यात आले. तरीदेखील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सध्या सर्वत्र नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. बाजारात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी उपलब्ध आहेत. एक डोस कोव्हिशिल्डचा आणि दुसरा कोव्हॅक्सिनचा घेतला तर त्यामुळे थोड्याफार प्रमाणात त्रास होऊ शकतो. लस घेतलेल्या नागरिकांमध्ये पाहिजे त्या अँटीबॉडीज तयार होत नाहीत. शिवाय लसीकरणाद्वारे होणाऱ्या उपचाराचे वर्तुळदेखील पूर्ण होत नाही. त्यामुळे कोणत्याही एकाच लसीचे डोस देण्यात यावे, अशा सूचना आहेत. असे असताना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात शहरातील लक्ष्मी कॉलनी येथील पुष्पा जनार्धन चौधरी यांनी १८ मार्च रोजी कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतला. तेव्हा त्यांना तात्पुरते प्रमाणपत्र मिळाले. दुसरा डोस २० एप्रिल रोजी घेतला. तेव्हा त्यांनी कोव्हॅक्सिनचा डोस घेतल्याचे अंतिम प्रमाणपत्र मिळाले. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात त्यांना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी मोबाइलवर संदेश यायला लागले. तेव्हा त्यांच्या मुलांनी प्रमाणपत्र डाउनलोड करून पाहिले असता, दोन्ही डोसचे दोन वेगवेगळे प्रमाणपत्र त्यांना मिळाल्याचे सामोरे आले.
----
सुरक्षित समजणाऱ्यांना बसला धक्का
लसीचे दोन्ही डोस घेऊन स्वतःला सुरक्षित समजणाऱ्यांना यामुळे धक्का बसला आहे. आपण खरच दोन्ही डोस पूर्ण केले की नाही? आपल्याला पुन्हा लस घ्यावी लागेल का ? दोन वेगवेगळ्या लसीच्या डोसची नोंद असताना अंतिम प्रमाणपत्र कसे मिळाले? आधार नोंदणी एकदाच केली असताना दोन्ही प्रमाणपत्रावर वेगवेगळे वय कसे? अशा अनेक प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आहे. आधिच लसीकरणाबद्दल गैरसमज असताना ऑनलाइन चुकीमुळे व आरोग्य यंत्रणेच्या गोंधळाने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कोट
१८ मार्च रोजी सर्व १०० नागरिकांना कोव्हॅक्सिनचे डोस दिले आहे; मात्र ऑनलाइन नोंदणीत चूक झाल्याने प्रमाणपत्र फक्त कोव्हिशिल्ड दिले गेले. या सर्वांना दुसरा डोसदेखील कोव्हॅक्सिनचाच दिला गेला आहे. आमच्याकडे तेव्हा कोव्हॅक्सिन लस आल्याची नोंद आहे.
- डॉ. गीतेश चावडा,
प्र. वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर.