दुचाकीस्वार दोन भामट्यांनी लांबविले महिलेचे गंठण व साखळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 02:08 PM2021-06-01T14:08:24+5:302021-06-01T14:26:11+5:30
पाठीमागे बसलेल्या भामट्याने महिलेच्या गळ्यातील ९ ग्रॅम वजनाचे अर्धे गंठण व १५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हिसकावून धूम ठोकली.
वाळूज महानगर : मेडिकलमधून औषधे घेऊन घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व साखळी दुचाकीस्वार दोघांनी लांबविल्याची घटना रविवारी (दि.३०) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सिडको वाळूजमहानगर येथे घडली. दागिने ओरबाडल्यानंतर दुचाकीस्वार भामटे अंधाराचा फायदा घेऊन सुसाट फरार झाले.
मीना प्रल्हाद घुले (५५, रा. सिडको वाळूजमहानगर) या रविवारी सांयकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मुलगी अमिता संतोष मोरे यांना सोबत घेऊन मेडिकल स्टोअर्सवर गेल्या होता. औषधी घेऊन दोघी मायलेकी घराकडे पायी जात असताना सिडको कार्यालयालगतच्या कबीर कोर्ट फंक्शन हॉलजवळ पाठीमागून आलेल्या भामट्यांनी दुचाकीचा वेग कमी केला. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या भामट्याने मीना घुले यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व सोन्याची साखळी ओरबाडली. प्रसंगावधान राखत मीना घुले यांनी गंठण हाताने पकडून ठेवल्याने गंठणाचा अर्धा भाग व सोन्याची साखळी हिसकावून दुचाकीस्वार पसार झाले. त्यांनी मदतीसाठी आरडा-ओरडा केला. अॅड. प्रल्हाद घुले व अन्य नागरिकांनी तिकडे धाव घेतली. नागरिकांनी सिडको वाळूजमहानगर परिसरात दुचाकीस्वार मंगळसूत्र चोरट्याचा शोध घेतला.
हे भामटे काळ्या रंगाच्या स्पोर्ट दुचाकीवरून आले होते. पाठीमागे बसलेल्या भामट्याने मीना घुले यांच्या गळ्यातील ९ ग्रॅम वजनाचे अर्धे गंठण व १५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हिसकावून धूम ठोकली. विशेष म्हणजे दोघांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तसेच विनामास्क होते. दुचाकीस्वारांनी महिलेचे मंगळसूत्र लांबविल्याची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त विवेक सराफ व पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सोमवारी घटनास्थळी भेट दिली. मंगळसूत्र लांबविताना भामटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची शक्यता असल्याने या भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी अॅड. प्रल्हाद घुले यांच्या तक्रारीवरून मंगळसूत्र चोरट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.