पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अन उपसभापती दोन्ही पदे बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 04:09 PM2023-05-22T16:09:08+5:302023-05-22T16:12:48+5:30
भापती व उपसभापती पदासाठी निर्धारित वेळेत राजूनाना भुमरे व राम पा. ऐरंडे यांचेच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली.
पैठण: पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राजूनाना भुमरे यांची तर उपसभापतीपदी जेष्ठ संचालक राम पा एरंडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचा सर्व पँनल बहुमताने विजयी झाला होता. सभापती उपसभापतीची निवड झाल्यानंतर समर्थकांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.
आज सकाळी सभापती व उपसभापती यांची निवड करण्यासाठी सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक अनिल पुरी, बाजार समितीचे सचिव नितीन विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया सुरू करण्यात आली. सभापती व उपसभापती पदासाठी निर्धारित वेळेत राजूनाना भुमरे व राम पा. ऐरंडे यांचेच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. राजूनाना भुमरे यांची दुसऱ्यांदा सभापती म्हणून निवड झाली असून उपसभापती पदी वर्णी लागलेले राम एरंडे गेल्या २५ वर्षापासून बाजार समितीचे संचालक आहेत. यामुळे बाजारसमितीचा कारभार अनुभवी हातात गेल्याचे मानले जात आहे.
पैठण बाजार समितीच्या निवडणुकीत रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व अठरा संचालक बहुमताने विजयी झाले होते. महाविकास आघाडीला या निवडणुकीत खातेही उघडता आले नव्हते. मंत्री भुमरे कुणाला संधी देणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, आज अपेक्षेप्रमाणे राजूनाना भुमरे व राम ऐरंडे यांची सभापती उपसभापती पदी निवड झाली.
आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात संचालक, बोंबले बद्रीनाथ, मुळे सुभाष, दोरखे विठ्ठल, तांबे राजेंद्र, मोगल सचिन, कारके भगवान, नरके शरद, तवार संभाजी, जाधव शिवाजी, व्होरकटे साईनाथ, खराद मनीषा नामदेव, शशिकलाबाई परसराम हजारे, घनवट गंगासागर , काला महावीर, मुंदडा महेश, टेकाळे राजू यांच्या सह महानंदचे राज्य संचालक नंदलाल काळे, शिवाजी बँकेचे अध्यक्ष रवींद्र काळे, शेखर शिंदे, भूषण कावसानकर, शहादेव लोहारे, सुनील हिंगे, रवींद्र सिसोदे, अमोल एरंडे, नितीन एरंडे, नामदेव खराद, अमोल जाधव, दिनेश खंडागळे आदींसह मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते.