जिल्हा बँकच्या अध्यक्षपदाची आज होणार निवड; संचालक मंडळाचा कल अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:34 AM2019-06-13T11:34:09+5:302019-06-13T11:37:22+5:30
विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या ‘मनातील अध्यक्ष कोण’ यावरही बरेसचे अवलंबून
औरंगबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवड येत्या १३ जून रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या संचालक मंडळ बैठकीच्या सभागृहात होत असून, त्याआधी सर्व संचालक एकत्रित येऊन कुणाला अध्यक्ष करायचे, हे ठरवतील व नंतर निवड प्रक्रियेला सामोरे जातील. सकाळी ११ वा. विभागीय सहनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रियेस प्रारंभ होईल.
सुरेशदादा पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी दादांचे पुत्र नितीन पाटील हे प्रबळ दावेदार ठरत आहेत. स्वत: नितीन पाटील यांनी अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. मतदार असलेल्या संचालकांच्या ते गाठीभेटी घेऊन आपण अध्यक्ष होण्यास इच्छुक असल्याचे व सहकार्य करण्याचे सांगत आहेत. प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले की, अध्यक्षपदी नियुक्ती होण्यास मला तशी फारशी अडचण वाटत नाही.
इच्छुकांची संख्या एकापेक्षा अधिक नक्कीच असली तरी अवघ्या काही महिन्यांसाठी हे अध्यक्षपद असल्याने ते नितीन पाटील यांना देऊन सुरेशदादांनी केलेल्या सहकार्यातून उतराई होऊ या, अशी एक मानसिकता दिसून येत आहे. त्याचा फायदा नितीन पाटील यांना नक्कीच होऊ शकतो. हरिभाऊ बागडे, रामकृष्णबाबा पाटील, आ. संदीपान भुमरे, आ. अब्दुल सत्तार यांची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे.
नितीन पाटील नको या भूमिकेतून काही संचालक हालचाली करीत असले, तरी त्यांना बहुमत मिळविण्यात बरीच मेहनत करावी लागणार आहे. १३ जून रोजी अध्यक्षपदासाठी एकमत होऊ शकते की मतदानास सामोरे जावे लागते, हे त्यादिवशी सकाळी होणाऱ्या बैठकीत समजू शकेल. बँकेचे एक संचालक जावेद पटेल यांनी ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमास संचालकांना निमंत्रित केले होते. त्यावेळी अनेक संचालक आले; पण अध्यक्षपदावर त्यांची चर्चा झाली नाही.
११ संचालक पात्र
एकूण १९ संचालक मतदानास पात्र आहेत. त्यात भाजपचे तीन, शिवसेनेचे तीन, राष्ट्रवादीचे तीन व उर्वरित काँग्रेसचे आणि अपक्ष आहेत. बँकेचे ज्येष्ठ संचालक व महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या ‘मनातील अध्यक्ष कोण’ यावरही बरेसचे अवलंबून आहे.