अपघातानंतरही दुसऱ्या गाडीमधून चैतन्य तुपेला पळवून नेण्याचा प्रयत्न; असे पकडले अपहरणकर्ते
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 13:55 IST2025-02-06T13:54:39+5:302025-02-06T13:55:18+5:30
८ जिल्ह्यांचे अधीक्षक, २ राज्यांच्या अतिरिक्त संचालकांशी संपर्क, ३१ अधिकारी, १५० अंमलदार तपासकामी

अपघातानंतरही दुसऱ्या गाडीमधून चैतन्य तुपेला पळवून नेण्याचा प्रयत्न; असे पकडले अपहरणकर्ते
छत्रपती संभाजीनगर/भोकरदन : चैतन्यच्या २ कोटींच्या खंडणीसाठी अपहरण झाल्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली. आरोपींच्या अटकेपेक्षा मुलगा सुखरूप हवा, असा संदेश देत, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी ३१ वरिष्ठ अधिकारी, १५० अंमलदारांना तपासकामी लावले. अपहरणकर्ते राज्याबाहेर न जाण्यासाठी ८ जिल्ह्यांचे पाेलिस अधीक्षक, २ राज्यांच्या अतिरिक्त पोलिस संचालकांना अलर्ट कळविला होता.
मंगळवारी रात्री घटना समजताच, पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निरीक्षक कुंदन जाधव यांनी पोलिस आयुक्तांना कळविले. उपायुक्त शिलवंत नांदेडकर, प्रशांत स्वामी, सहायक पोलिस आयुक्त सुदर्शन पाटील, मनोज पगारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, कुटुंबाने पोलिस आयुक्तालयात धाव घेतली. सायबर, आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे शाखा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण कक्षाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तत्काळ आयुक्तालयात दाखल होण्याचे आदेश जारी झाले. निरीक्षक संदीप गुरमे, गीता बागवडे, संभाजी पवार यांच्याकडे मुख्य तपास देण्यात आला. रात्री २ वाजता आरोपींनी चैतन्याचे वडील सुनील तुपेंना केलेला काॅल तळेगावमधून केल्याचे निष्पन्न झाले. उपनिरीक्षक विशाल बोडखे, संदीप सोळुंके तत्काळ रवाना झाले. पहाटेपर्यंत ते आसपासच्या वस्त्यांवर अपहरणकर्त्यांचा शोध घेत होते.
सकाळी पोलिसांशी संपर्क
गुन्हे शाखा तळेगावमध्ये शोध घेत असताना, अपहरणकर्त्यांच्या कारचा १ वाजता भोकरदनमध्ये अपघात झाला, पण कटाचा सूत्रधार हर्षलचे सर्व लक्ष चैतन्यवर होते. त्याने तत्काळ त्याला घेत जीवन, बंटी, कृष्णासह अंधारात पोबारा केला. जखमी प्रणवला रुग्णालयात दाखल केल्याने त्याला पळण्याची संधी मिळाली नाही.
सुसाट कार दोनदा उलटली
अपहरणकर्त्यांनी कारमध्ये दारू ढोसली. हसनाबाद, भोकरदनमार्गे जाफराबादकडे सुसाट जाताना रात्री १ वाजता आसई पाटीजवळ मालवाहू गाडीला त्यांची कार धडकली. अतिवेगामुळे कार खांबाला धडकून दोन वेळेस उलटून सुखदेव जाधव यांच्या शेतात जाऊन पडली. यात गाडीचा चक्काचूर झाला. एअरबॅग्ज उघडल्याने समोर बसलेला चैतन्य व इतरांना मोठी दुखापत झाली नाही.
तरीही चैतन्याला पळवायचे होते
अपघातानंतरही हर्षलला चैतन्याला पळवून न्यायचे होते. शिवराज एका व्यक्तीच्या गाडीवरून गावात पोहोचून सकाळी जेसीबीवर कामावर निघून गेला. जीवनने प्राथमिक उपचार घेत जाफ्राबाद बस स्थानकावर रात्र काढली. हर्षलचे तरीही चैतन्यला पळवून नेण्याचे प्रयत्न सुरू होते. भाऊ संकेतला कॉल करून त्याच्या मदतीने ब्रह्मपुरी-मंगरुळ शिवारातील शेतामध्ये लपून बसला.
दबाव तंत्राचा वापर
सकाळी ७ वाजता भोकरदन पोलिसांना ती कार संशयास्पद वाटली. अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना ही बाब कळताच त्यांनी पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर, तळेगावातील गुन्हे शाखेने प्रणवकडे धाव घेतली.
घटनाक्रम उलगडला
प्रणवच्या चौकशीत घटनाक्रम उलगडत गेला. अपहरणकर्त्यांची ओळख स्पष्ट झाली. उपनिरीक्षक विशाल बोडखे, संदीप सोळुके यांनी तत्काळ जीवन, शिवराज व कृष्णाला गावातून उचलले. त्यांच्या चौकशीत हर्षल हा त्याचा सख्ख्या भाऊ संकेतसोबत गेल्याचे समजले. पोलिसांनी संकेतला ताब्यात घेतले. पण संकेत तोंड उघडत नव्हता. त्यांच्या आई-वडिलांच्या अटकेचे नाटक पोलिसांनी करताच, संकेतने हर्षलचा पत्ता सांगितला. बोडखे यांनी शेतात धाव घेत हर्षलला पकडले.
५ अपहरणकर्ते २४ तासांत जेरबंद
ज्ञानेश्वर उर्फ हर्षल पंढरीनाथ शेवत्रे (२१), जीवन नारायण शेवत्रे (२६), प्रणव समाधान शेवत्रे (१९), कृष्णा संतोष पठाडे (२०, चौघेही रा.ब्रह्मपुरी, ता.जाफ्राबाद), शिवराज उर्फ बंटी विलास गायकवाड (२०, रा.आळंद) अशी अपहरणकर्त्यांची नावे आहेत.
यांची उल्लेखनीय कारवाई
भोकरदनचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणपत दराडे, निरीक्षक किरण बिडवे, संदीप गुरमे, गीता बागवडे, सायबरचे कदिर देशमख, विनायक शेळके, काशीनाथ महांडुळे, विशाल बोडखे, संदीप सोळुंके, प्रमोद देवकाते, गणेश केदार, अर्जुन कदम, पुंडलिकनगरचे कुंदन जाधव, सुनील म्हस्के, टेंभुर्णीचे सचिन खामगळ, सागर शिंदे, पवन राजपूत यांनी अखंड चोवीस तास मोठी मेहनत घेतली.