चैतन्यच्या अपहरणात दोन कोटी मिळाल्यानंतर जबाबदारीप्रमाणे होणार होते पैशांचे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:45 IST2025-02-12T15:42:50+5:302025-02-12T15:45:01+5:30
हर्षलच्या आश्वासनानंतर कटाची आखणी : पिस्तूल पुरवणाऱ्याचा बिहारमध्ये शोध

चैतन्यच्या अपहरणात दोन कोटी मिळाल्यानंतर जबाबदारीप्रमाणे होणार होते पैशांचे वाटप
छत्रपती संभाजीनगर : एन-४सारख्या उच्चभ्रू वसाहतीमधून मोठ्या बंगल्यातील मुलाचे अपहरण करायचे, त्याच्या सुटकेसाठी दोन कोटी रुपये मिळाल्यानंतर जबाबदारीच्या महत्त्वाप्रमाणे पैशांचे वाटप होईल, या आश्वासनावर अपहरणकर्त्यांनी एकत्र येत कटाचे अंतिम नियोजन केले होते, अशी बाब चैतन्य तुपे अपहरण प्रकरणात उघडकीस आली आहे.
४ फेब्रुवारी रोजी रात्री एन-४मधून चैतन्याच्या अपहरणाने शहर हादरले. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, जालना पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या तत्परतेने चैतन्य सुखरूप घरी परतला. मात्र, शहरात दहशत पसरली. देवळाई, बेगमपुऱ्यात दोन जणांना अपहरणाच्या संशयातून बेदम मारहाणदेखील करण्यात आली. चैतन्याच्या अपहरणकर्त्यांना मंगळवारी सहायक निरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे यांनी न्यायालयात हजर केले. कुटुंबाकडून वकील नियुक्त न केल्याने विधी सेवा प्राधिकरणातर्फे लोकन्यायरक्षक ॲड. कन्हैया शर्मा, शिवशंकर फटाड, विशाल काकडे यांनी आरोपींच्या वतीने बाजू मांडली. न्यायालयाने आरोपींना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
हे आहेत अटकेत
-ज्ञानेश्वर उर्फ हर्षल पंढरीनाथ शेवत्रे (२१), जीवन नारायण शेवत्रे (२६), प्रणव समाधान शेवत्रे (१९), कृष्णा संतोष पठाडे (२०) हर्षल विनोद चव्हाण (२०, चौघेही रा. ब्रह्मपुरी, ता. जाफराबाद), शिवराज उर्फ बंटी विलास गायकवाड (२०, रा. आळंद), विवेक उर्फ साजन विभुती भूषण (२४, रा. जि. भोजपूर, बिहार).
या मुद्द्यांवर होणार तपास
-हर्षलने बिहारला जाऊन पिस्तूल कोणाकडून घेतले, यासाठी पोलिसांचे पथक बिहारमध्ये तपास करणार.
-आरोपींना अपहरणासाठी आणखी कोणी उद्युक्त केले, कोणी मदत केली ?
चैतन्यने प्रात्यक्षिक दाखवले
तो झोपेत नसल्याने आरोपींनी त्याचा गळा कसा दाबला, हे चैतन्यने हातवारे करून पोलिसांना दाखवले. त्यामुळे पोलिसांनी यात हत्येचा प्रयत्न केल्याचे कलम वाढवले. दरम्यान, पोलिस आता ती दोरी जप्त करणार आहेत.