खंडणीचे २ कोटी घेऊनही देणार नव्हते चैतन्यचा ताबा; अपहरणकर्त्यांचा अवयव तस्करीचाही कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 12:12 IST2025-02-07T12:11:28+5:302025-02-07T12:12:48+5:30
खंडणीचे पैसे मिळाल्यानंतर अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळीला संपर्क करण्याचा होता कट; छत्रपती संभाजीनगरात आणखी दोघांकडून अपहरणासाठी रेकी, पोलिसांचा न्यायालयात धक्कादायक दावा

खंडणीचे २ कोटी घेऊनही देणार नव्हते चैतन्यचा ताबा; अपहरणकर्त्यांचा अवयव तस्करीचाही कट
छत्रपती संभाजीनगर : चिमुकल्याचे अपहरण करून अपहरणकर्ते दोन दिवस त्याला सांभाळणार होते. त्याच्या कुटुंबाला दोन दिवसांनंतर दोन कोटींची खंडणीच कुठे आणून द्यायची, याबाबत सांगणार होते. त्यानंतर अवयव विक्री (ऑर्गन स्मगलर्स) करणाऱ्या टोळीला संपर्क करून त्यांच्याकडूनही कोट्यवधी रुपये उकळण्याचा त्यांचा डाव होता, अशी धक्कादायक बाब चैतन्य तुपे अपहरण प्रकरणात समोर आली आहे.
मंगळवारी रात्री ८:४५ वाजता एन-४ मधून चैतन्याच्या अपहरणाने शहर हादरले. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, जालना पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या तत्परतेने चैतन्य सुखरूप घरी परतला. अटकेतील ज्ञानेश्वर ऊर्फ हर्षल पंढरीनाथ शेवत्रे (वय २१), जीवन नारायण शेवत्रे (२६), प्रणव समाधान शेवत्रे (१९), कृष्णा संतोष पठाडे (२०, चौघेही रा. ब्रह्मपुरी, ता. जाफ्राबाद), शिवराज ऊर्फ बंटी विलास गायकवाड (२०, रा. आळंद) यांना पुंडलिकनगर ठाण्याचे सहायक निरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे, सहायक निरीक्षक सुनील म्हस्के यांनी गुरुवारी दुपारी ४:३० वाजता न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना ११ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पोलिसांचे गंभीर दावे, आरोपींचे सिंडिकेट
- आरोपी सराईत असून, गावाकडे त्यांचे मोठे सिंडिकेट आहे.
- अपहरणानंतर खंडणीचे पैसे उकळायचे. मुलाला परत न देता अवयव तस्करी करणाऱ्या टोळीला संपर्काच्या प्रयत्नात होते.
- आरोपींनी शेतात फेकलेला मोबाइल, सीम जप्त करणे बाकी आहे.
- आरोपींना कोणी मदत केली, कोणी उद्युक्त केले, याचा तपास होईल.
आणखी दोघांकडून रेकी
सूत्रांच्या माहितीनुसार, हर्षल व्यतिरिक्त गावाकडील आणखी दोघांनी शहरात मुलांच्या अपहरणासाठी रेकी केली होती. ते कोणाचे अपहरण करणार होते, यासाठी पोलिस त्यांच्या शोधात आहे. पिस्तूल पुरवणाऱ्यासह गावाकडील आणखी दोन तरुणांचा आरोपींमध्ये समावेश होईल.
नंबर प्लेट बदलणारा लक्ष्य
गुन्ह्यातील काळ्या रंगाची बलेनो कार (एमएच १२ - पीसी - ३४५१) मूळ पुण्याच्या काेंढव्यात राहणाऱ्या वाघमारे नामक व्यक्तीची आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना चकवा देण्यासाठी गुन्ह्यात त्यांनी काळ्या रंगाच्याच बलेनोचा क्रमांक (एमएच २० - ईई -७१२६) शोधला. टी. व्ही. सेंटर परिसरातून त्याची प्लेट बनवली. कागदपत्रांशिवाय बनावट नंबर प्लेट बनवून देणारा व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर आहे.
कुटुंब दुखावले, ना भेट, ना वकील
आपल्या गावातील तरुण गंभीर गुन्ह्यात अडकल्याने आरोपींच्या कुटुंबासह ब्रम्हपुरी गाव हादरून गेले. गुरुवारी पाचही आरोपींच्या कुटुंबातील सदस्य ना भेटण्यास आले, ना त्यांच्यासाठी वकिलाची नियुक्ती केली.
चैतन्यची वैद्यकीय तपासणी
दरम्यान, घरी सुखरूप परतलेल्या चैतन्यची गुरुवारी वैद्यकीय चाचपणी करण्यात आली. शिवाय, यात त्याचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने गुन्ह्यात हत्येचा प्रयत्न केल्याचे कलम (बीएनएस १०९) वाढवण्यात येणार आहे.