अपहरणापासून सोळा तास अश्रू रोखले; पोलिस आयुक्तांच्या दालनात बाप-लेक धाय मोकलून रडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 13:07 IST2025-02-06T13:04:55+5:302025-02-06T13:07:02+5:30
आधी जे अपहरणकर्त्यांचे साथीदार वाटले; पोलिस असल्याचे समजताच आयुक्तालयात चैतन्यने त्यांचे पाय धरले

अपहरणापासून सोळा तास अश्रू रोखले; पोलिस आयुक्तांच्या दालनात बाप-लेक धाय मोकलून रडले
छत्रपती संभाजीनगर : अपहरणासोबतच चैतन्यने एक भीषण अपघात पाहिला. अपहरणकर्त्यांचा छळ सहन केला. तरीही चैतन्य डगमगला नाही. शेतात पोलिस पोहोचले तेव्हाही चैतन्य घाबरलेला, पण स्तब्ध होता. पोलिस आयुक्तालयात आणेपर्यंत शांत होता. पोलिस आयुक्तांच्या दालनाचे दार उघडले आणि सोळा तासांपासून दाबून ठेवलेल्या बाप लेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. कडकडून मिठी मारत दोघेेही धाय मोकलून रडले तेव्हा उपस्थित अधिकारीही गहिवरले.
अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर चैतन्य पोलिसांच्या पथकासह बुधवारी सायंकाळी ६:१५ वाजता पोलिस आयुक्तालयात पोहोचला. १६ तासांपासून भीती अन् अश्रू त्याने रोखून धरले होते. त्यामुळे ‘सुपरमॅन चैतन्य’ असे कौतुकोद्गार पोलिसांच्या तोंडून निघाले. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी त्याची चौकशी केली. त्याच्या कुटुंबाने पोलिसांचे आभार मानत सत्कार केला.
जे अपहरणकर्ते वाटले, त्यांचे पाय धरले
अपहरणकर्त्यांकडे शस्त्राची शक्यता होती. त्यामुळे शेतात शिरताना उपनिरीक्षक विशाल बोडखे, संदीप सोळुंके शस्त्रासह साध्या वेशात होते. चैतन्यपर्यंत ते पोहोचले, तेव्हा काही वेळ तेही हर्षलचेच साथीदार असल्याचे चैतन्यला वाटले. त्यामुळे तो स्तब्धच होता. विशाल यांनी आपली ओळख देत त्याच्या आजोबांना व्हिडिओ कॉल केला. त्यानंतर चैतन्यने त्यांच्यावर विश्वास ठेवला. शहरात परतताना निरीक्षक गीता बागवडे यांच्या मांडीवर डोके ठेवून तो झोपी गेला. पोलिस आयुक्तालयातून घरी जाताना चैतन्य सर्व अधिकाऱ्यांच्या पाया पडला. तेव्हा अपहरणकर्ते समजलेल्या विशाल यांच्या पाया पडताना 'थँक यू सर' असे म्हणत आभार मानले.