तुपेंचे ‘चैतन्य’ परतले; बिल्डरच्या मुलाची सुखरूप सुटका, ५ अपहरणकर्ते २४ तासांत जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 14:07 IST2025-02-06T13:55:28+5:302025-02-06T14:07:12+5:30

Chaitanya Tupe kidnapping: ब्रह्मपुरी गावातील एका मक्याच्या शेतातून पोलिसांनी चैतन्य तुपेची अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुटका केली

Chaitanya Tupe kidnapping: Tupe's 'Chaitanya' returns; Builder's son safely rescued, 5 kidnappers arrested within 24 hours | तुपेंचे ‘चैतन्य’ परतले; बिल्डरच्या मुलाची सुखरूप सुटका, ५ अपहरणकर्ते २४ तासांत जेरबंद

तुपेंचे ‘चैतन्य’ परतले; बिल्डरच्या मुलाची सुखरूप सुटका, ५ अपहरणकर्ते २४ तासांत जेरबंद

छत्रपती संभाजीनगर/भोकरदन : दाेन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झालेला चैतन्य सुनील तुपे (७, रा.एन-४) हा बुधवारी सायंकाळी ७ वाजता सुखरूप आईच्या कुशीत परतला. दुपारी १ वाजता ब्रह्मपुरी गावातील एका मक्याच्या शेतातून पोलिसांनी त्याची अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुटका केली, शिवाय पाचही खंडणीखोरांना अटक केली.

ज्ञानेश्वर उर्फ हर्षल पंढरीनाथ शेवत्रे (२१), जीवन नारायण शेवत्रे (२६), प्रणव समाधान शेवत्रे (१९), कृष्णा संतोष पठाडे (२०, चौघेही रा.ब्रह्मपुरी, ता.जाफ्राबाद), शिवराज उर्फ बंटी विलास गायकवाड (२०, रा.आळंद) अशी अपहरणकर्त्यांची नावे आहेत. मंगळवारी रात्री ८:४५ वाजता सुनील तुपे त्यांच्या दोन्ही मुलांसह खेळत होते. लहान मुलासोबत खेळत असताना चैतन्य घरापासून एन-४ च्या रस्त्याच्या दिशेने सायकल चालवत गेला. त्याच वेळी मागून काळ्या रंगाची कार आली. त्याच्या सायकलच्या बाजूलाच अपहरणकर्त्यांनी कार उभी केली. चालकाच्या मागील बाजूने दोघांनी उतरून एकाने चैतन्यला उचलून चालकाच्या डाव्या बाजूने कारमध्ये कोंबले, तर दुसऱ्याने सायकल चालवत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेऊन फेकली. त्यानंतर, अपहरणकर्ते चैतन्यला घेऊन हनुमान चौकाच्या दिशेने सुसाट निघून गेले.

एक कॉलने यंत्रणा लागली कामाला
चैतन्यसह अपहरणकर्ते जय भवानीनगर, कामगार चौक, हायकोर्ट, रामगिरीमार्गे सिडको चौकाच्या दिशेने गेले. तेथून फुलंब्री, पालफाट्याच्या पुढे जात राजूर रस्त्यावरील तळेगावमध्ये कार थांबविली. हर्षल कार चालवत होता. कारखाली उतरून त्याने सुनील यांना कॉल करून हिंदीतून चैतन्याच्या सुटकेसाठी २ कोटींची खंडणी मागितली. त्यानंतर, मोबाइल बंद झाला. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्यापर्यंत ही बाब पोहोचताच, शहर पोलिस दलाची पूर्ण यंत्रणा तपासकामी लागली.

सुसाट कार दोनदा उलटली
अपहरणकर्त्यांनी कारमध्ये दारू ढोसली. हसनाबाद, भोकरदनमार्गे जाफराबादकडे सुसाट जाताना रात्री १ वाजता आसई पाटीजवळ मालवाहू गाडीला त्यांची कार धडकली. अतिवेगामुळे कार खांबाला धडकून दोन वेळेस उलटून सुखदेव जाधव यांच्या शेतात जाऊन पडली. यात गाडीचा चक्काचूर झाला. एअरबॅग्ज उघडल्याने समोर बसलेला चैतन्य व इतरांना मोठी दुखापत झाली नाही.

...आणि कट उलगडत गेला
अपघात होताच, हर्षलने चैतन्यला बाहेर काढत जीवन बंटी, कृष्णासह अंधारात पळ काढला. प्रणवला पळता न आल्याने तो गाडीमालक गजानन भावले व ग्रामस्थांच्या हाती लागला. हे अपहरणकर्ते असल्याची त्यांना कल्पना नव्हती. प्रणवला चोप देत भोकरदनच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. भोकरदन पोलिसांना माहिती मिळताच, उपनिरीक्षक सागर शिंदे यांनी सहकाऱ्यांसह धाव घेतली.

...शेतात झडप
भोकरदनच्या अपघाताची माहिती मिळताच, गुन्हे शाखेचे संदीप गुरमे, उपनिरीक्षक विशाल बोडखे, संदीप सोळुंके यांनी रुग्णालयात धाव घेतली. प्रणवची कसून चौकशी केली. त्यानंतर, जीवन, शिवराज व कृष्णाला घरातून ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत हर्षल चैतन्यला घेऊन गावाजवळील मक्याच्या शेतात लपून बसल्याचे कळताच, पथकाने शेतात धाव घेत, हर्षलवर झडप टाकत चैतन्यची सुटका केली. सायंकाळी चैतन्यला पोलिस आयुक्तालयात आणण्यात आले. तेथून तो ७ वाजता घरी परतला.

Web Title: Chaitanya Tupe kidnapping: Tupe's 'Chaitanya' returns; Builder's son safely rescued, 5 kidnappers arrested within 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.