चैतन्य अपहरण : मोबाइल, सीमकार्ड, पिस्तूल पुरवणारे दोघे उत्तर प्रदेश, बिहारमधून अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 14:50 IST2025-03-11T14:46:53+5:302025-03-11T14:50:02+5:30
नेपाळ सीमेवर गुन्हे शाखेच्या पथकाची पाच दिवस रेकी

चैतन्य अपहरण : मोबाइल, सीमकार्ड, पिस्तूल पुरवणारे दोघे उत्तर प्रदेश, बिहारमधून अटकेत
छत्रपती संभाजीनगर : एन-४ मधून चैतन्य तुपे या चिमुकल्याच्या अपहरण प्रकरणात गुन्हे शाखेने रामप्रवेश रघुनाथ मद्देशिया (रा. पिपरा जटामपूर, कुशीनगर, उत्तर प्रदेश) व राजीव ऊर्फ ढोना रंजन कुमार (वय २७, रा. जगदीशपूर, भोजपूर) यांना अटक करून सोमवारी शहरात आणले. पाच दिवसांपासून गुन्हे शाखेची दोन पथके दोन्ही राज्यांत रेकी करून दबा धरून बसली होती.
४ फेब्रुवारी रोजी रात्री एन-४ मधून चैतन्यच्या अपहरणाने शहर हादरले होते. अपहरणकर्त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि चैतन्यला पळवून नेण्याचा कट फसला. यामुळे अवघ्या १६ तासांच्या आत अपहरणकर्ते पोलिसांच्या हाती लागले व चैतन्यची सुखरूप सुटका झाली. यात अपहरणाचा मुख्य सूत्रधार हर्षल शेवत्रे याला सीमकार्ड, माेबाइलसाठी रामप्रवेशने मदत केली होती, तर राजीवने साजन ऊर्फ विवेक विभूती याच्या माध्यमातून पिस्तूल पुरवले हाेते. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विशाल बाेडखे उत्तर प्रदेशमध्ये, तर विशाल सोळुंके बिहारमध्ये पाच दिवसांपासून दोघांच्या शोधात हाेते.
सीम, मोबाइलची मदत, चार लाखांची कबुली
पुण्याला सोबत मजुरीचे काम करताना हर्षलने रामप्रवेशला अपहरणाचा विचार सांगितला होता. त्यासाठी रामप्रवेशने त्याला उत्तर प्रदेशचे सीम व एक जुना मोबाइल पुरवला. यासाठी हर्षलने अपहरणानंतर दोन कोटी पैकी चार लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले होते. मात्र, अपहरणाचा कट फसल्याची कुणकुण रामप्रवेशला कळताच तो पुण्यातून पळून गावाला गेला होता.
दिवसा बिहारमध्ये, मध्यरात्री घरी
रामप्रवेशचे गाव उत्तर प्रदेश-नेपाळ सीमेवर आहे. तेथून बिहारदेखील जवळ आहे. आपल्या अटकेसाठी पोलिस कधीही येतील, या भीतीने रामप्रवेश दिवसभर बिहारमध्ये रोजंदारीवर जाऊन मध्यरात्री घरी परत यायचा. उपनिरीक्षक विशाल बोडखे यांच्या पथकाने चार दिवस पाळत ठेवून त्याला शनिवारी अटक केली, तर राजीवला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतले.
दहा आरोपींना अटक
हर्षल शेवत्रे (वय २१), जीवन शेवत्रे (२६), प्रणव शेवत्रे (१९), कृष्णा पठाडे (२०) हर्षल चव्हाण (२०, चौघेही रा. ब्रह्मपुरी), शिवराज गायकवाड (२०), विवेक ऊर्फ साजन भूषण (२४, रा. बिहार), संकेत शेवत्रे (१९).