दोन शाळकरी विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला, १ गंभीर
By Admin | Published: January 7, 2017 09:22 PM2017-01-07T21:22:07+5:302017-01-07T21:22:07+5:30
जुन्या भांडणातून दोन शाळकरी विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला असून एकाची प्रकृती गंभीर आहे.
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ७ - जुन्या भांडणाच्या कारणावरुन हर्सूल आणि भारतमातानगर येथील शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी एका विद्यार्थ्याने केलेल्या चाकूहल्लयात दोन मुले जखमी झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर असून तो आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. ही घटना शनिवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास हडकोतील भारतमातानगर रोडवर घडली. याप्रकरणी रात्रीउशीरापर्यंत सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.
रोहित वसंत खरात (१६,रा. सुभाषचंद्रबोस नगर,हडको एन-११ ) , अजीत थोरात अशी जखमींची नावे आहेत. रोहितची प्रकृती चिंताजनक असून त्याला जळगाव रोडवरील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगतले की, रोहित हा जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस शाळेत दहावीमध्ये शिकतो. शाळेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी त्याचे मित्र अजीत थोरात,निखील खरात आणि अजय कासारे हे शनिवारी सकाळी रोहितच्या घरी दुचाकीने गेले. एकाच दुचाकीवर चौघांना शाळेत जाणे शक्य नसल्याने रोहितच्या घरी दुचाकी उभी करून ते रिक्षाने शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडले. एसपीआयजवळून ते जात असताना हर्सूल येथील ७ ते ८ विद्यार्थ्यांनी त्यांना गाठले आणि त्यांच्याशी वाद सुरू केला.यावेळी एका मुलाने चाकूने रोहित व अजीतवर सपासप वार सुरू केले.यात रोहित याच्या पोटावर,पाठिवर तर अजीतच्या हातावर त्याने वार केल्याने ते रक्तबंबाळ झाले. या हल्लयानंतर ही मुले तेथून पळून गेले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रोहित आणि अजीतला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलिसांनी जखमींचा जबाब नोंदवून घेतला. याविषयी रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.