‘चाकण पॅटर्न’प्रमाणेच वाळूजमध्ये ‘इंडस्ट्री टार्गेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:28 AM2018-08-14T01:28:59+5:302018-08-14T01:29:31+5:30
पुणे जिल्ह्यातील चाकण येथील उद्योगनगरीत ज्या पद्धतीने महाराष्ट्र बंददरम्यान जाळपोळ करण्यात आली, त्याच धर्तीवर औरंगाबादेतील वाळूज एमआयडीसीला टार्गेट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे
औरंगाबाद : पुणे जिल्ह्यातील चाकण येथील उद्योगनगरीत ज्या पद्धतीने महाराष्ट्र बंददरम्यान जाळपोळ करण्यात आली, त्याच धर्तीवर औरंगाबादेतील वाळूज एमआयडीसीला टार्गेट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ९ आॅगस्ट रोजी करण्यात आलेल्या जाळपोळीत लहान-मोठे मिळून सुमारे ७५ उद्योगांचे नुकसान झाले आहे. ११६ कोटी रुपयांचे नुकसान उद्योग प्रक्रियेपोटी, तर ६० कोटींचे नुकसार जाळपोळ आणि तोडफोडीमुळे झाले आहे. १७६ कोटी रुपयांचे थेट नुकसान उद्योगांचे झाले असून, याचे वेगवेगळ्या पातळीवर परिणाम होत आहेत.
चाकणमधील उद्योगनगरीत जशी टोळक्यांनी तोडफोड केली होती, त्याच धर्तीवर वाळूज औद्योगिक वसाहतीत तोडफोड करण्यात आली. बहुराष्ट्रीय कंपन्या यातून लक्ष्य करण्यात आल्या. या सगळ्या तोडफोडीमागे सूत्रधार कोण, याचा शोध घेणे वाळूज एमआयडीसी पोलिसांना जमणार काय? असा प्रश्न आहे.
६० ते ८० जणांचे टोळके प्रत्येक ठिकाणी
कॅनपॅक इं प्रा.लि.आणि वोक्हार्ट कंपनीपासून तोडफोडीस सुरुवात झाली. १० मिनिटांत कंपनी बंद करा, असे सांगणारी एक टोळी ११ वाजेच्या सुमारास त्या सेक्टरमध्ये फिरत होती. त्यानंतर दुसरी टोळी दुचाकीवरून आली, त्यात बहुतांश जण स्थानिक नव्हते. काही हल्लेखोर अल्पवयीन असल्याचे उद्योजकांनी सांगितले.