वाहनांवर चलान फाडतात; पण माहिती देत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 08:14 PM2021-09-24T20:14:04+5:302021-09-24T20:14:30+5:30

औरंगाबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या वाहतूक शाखेतर्फे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारक, चालकांवर ई-चलान प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येत आहे

Challans on vehicles; But do not provide information | वाहनांवर चलान फाडतात; पण माहिती देत नाहीत

वाहनांवर चलान फाडतात; पण माहिती देत नाहीत

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात १७ हजार २६१ वाहनधारकांचे चलान प्रलंबित

औरंगाबाद : शहरात रस्त्यावरून जाणाऱ्या शेकडो वाहनांवर विविध नियमांचा भंग केल्यामुळे ई-चलान फाडण्यात येते. वाहनचालकाला थांबवून ही कारवाई होत नसल्यामुळे चलान फाडण्यात आले की नाही, याची माहितीच संबंधितांना होत नाही. त्यामुळे शहरात तब्बल १७ हजार २६१ वाहनधारकांनी ई-चलान फाडल्यानंतर दंड भरलेला नाही. वाहनधारकांना आपल्या वाहनांवर एवढा दंड असल्याची माहिती पोहोचविण्याची कोणतीही यंत्रणा वाहतूक पोलीस, मोटार वाहन विभागाकडे अस्तित्वात नसल्याची बाब समोर आली आहे.

औरंगाबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या वाहतूक शाखेतर्फे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारक, चालकांवर ई-चलान प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येत आहे. चौकाचौकांत वाहतूक पोलीस हातातील मोबाईलमध्ये वाहनाचा फोटो काढून ई-चलान फाडतात. हे चलान फाडल्यानंतर दिवसभरात केलेल्या कारवायांची आकडेवारी जुळविण्यात येते. पोलीस कर्मचारी दिलेले टार्गेट पूर्ण करतात. हे करीत असताना वाहनधारकांकडून त्याची किती वसुली होते, याकडे कोणाचेही लक्ष देत नसल्याचे दंड थकीत असलेल्या वाहनांच्या संख्येवरून स्पष्ट झाले आहे.

औरंगाबाद शहरातच कारवाईनंतर १७ हजार २६१ वाहनधारकांनी दंड भरलेला नाही. या कारवाईतील बहुतांश वाहनधारकांना चलान फाडण्यात आल्याची माहितीच नसते. आरटीओकडे नाेंद असलेल्या वाहनांसोबत मोबाईल नंबर अपडेट नसतो. आरटीओ कार्यालयात नोंदणी अर्जावर मोबाईल क्रमांक नमूद केला जात नाही अथवा चुकीचा मोबाईल नंबर नमूद केला जातो. त्यामुळे वाहनधारकांना कारवाईची माहिती होत नाही. यातून दंडाची रक्कम वाढतच जाते. याशिवाय वाहतूक पोलीसही सतत ई-चलान घेत असल्यामुळे वाहनधारकांना अडवून चौकशी करीत नसल्याचे पाहणीत समोर आले. तसेच आपल्या वाहनांवर काही दंड आहे का, हे पाहण्यासाठी शासनाच्या वेबसाईटवर जाऊन गाडी नंबर आणि चेसिस नंबर टाकून पाहावे लागते. काही स्मार्ट वाहनधारक काही दंड आहे का, याची पाहणी करतात. मात्र, प्रत्येकालाच ते शक्य होत नसल्याचे दिसून आले.

वाहनधारकांनी अधिक काळजी घ्यावी 
वाहनधारकांना आपण कोठे नियमांचा भंग केला हे पूर्णपणे माहीत असते. तसेच सगळे काही ऑनलाईन असल्यामुळे त्यावर नंबर टाकून पाहावे. तेव्हा सगळ्या गोष्टी समोर येतात. पोलीस असेल किंवा आरटीओ विभाग हे कारवाई करीत असतात. वाहनधारकांनी अधिक काळजी घेतली पाहिजे.
- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Challans on vehicles; But do not provide information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.