समृद्ध साहित्य निर्मितीचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:53 AM2017-08-21T00:53:33+5:302017-08-21T00:53:33+5:30
समृद्ध साहित्य निर्मिती हेच साहित्यिकांसमोर आव्हान आहे. आपले साहित्य समाजनिर्मितीसाठी योगदान ठरावे अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्या.अंबादास जोशी यांनी व्यक्त केली
अविनाश मुडेगावकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : समृद्ध साहित्याचे वाचन माणसाला मर्यादांपासून दूर घेऊन जाते. यासाठी समृद्ध साहित्य निर्मिती हेच साहित्यिकांसमोर आव्हान आहे. आपले साहित्य समाजनिर्मितीसाठी योगदान ठरावे अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्या.अंबादास जोशी यांनी व्यक्त केली.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीने रविवार, २० आॅगस्ट रोजी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात सातव्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून अंबादास जोशी बोलत होते. अध्यक्षस्थानी मसापचे शाखाध्यक्ष अमर हबीब, व्यासपीठावर स्वागताध्यक्ष अॅड. शरद लोमटे, मसाप केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य दगडू लोमटे, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, मावळते अध्यक्ष श्रीहरी नागरगोजे, ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी, स्वागताध्यक्ष जि.प.चे सभापती राजेसाहेब देशमुख, साहित्यिका शीतल बोधले, डॉ. सा.द. सोनसळे उपस्थित होते.
पुढे बोलताना न्या. जोशी म्हणाले, निकोप लोकशाहीसाठी मतभिन्नता हवी हे सांगून साहित्य क्षेत्रात वकील बांधवांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या थोर राजकारण्यांची परंपरा लाभलेली आहे. साहित्यक्षेत्राला वृद्धिंगत करण्यासाठी यशवंतरावांचे योगदान विसरता येणार नाही. यशवंतरावांच्या विचारांचा वारसा ज्या राजकारण्यांनी जोपासला, त्या व्यक्तींची राजकीय विमाने आजही आकाशात उंच उडत आहेत. माणसाचा माणसाशी संबंध तुटू नये. याची काळजी साहित्यिकांनी घेतली पाहिजे. परस्परांमध्ये संपर्क व समन्वय न झाल्यास बौद्धिक क्षमता कमी होते, असे जोशी म्हणाले. साहित्य संक्रमित करण्याची पद्धती विकसित झाली पाहिजे. साहित्यिकांनी निर्माण केलेली साहित्यकृती ही पोटच्या अपत्याप्रमाणे असते. मात्र हे अपत्य सुदृढपणे समाजासमोर गेले पाहिजे. याची दक्षताही साहित्यिकांनी बाळगली पाहिजे. आपले लेखन वाचकांना कसे भावेल? हा उद्देश साहित्यातून प्रकट व्हावा. सामाजिक वेदना , सामाजिक जाणिवा व मतभिन्नता दूर करून निकोप साहित्य निर्मिती करण्याचे आव्हान नवसाहित्यिकांसमोर असल्याचे ते म्हणाले. ही जबाबदारी समर्थपणे पार पाडावी असे आवाहन माजी न्या. अंबादास जोशी यांनी केले.
संमेलनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलनाने सातव्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. मावळते अध्यक्ष श्रीहरी नागरगोजे यांनी नूतन अध्यक्षांकडे आपला पदभार सोपवला.
मान्यवरांचे स्वागत संमेलनाच्या स्वागताध्यक्षांच्या वतीने करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. डॉ. वैशाली गोस्वामी यांनी केले. आभार अॅड. पी. जी. जवळबनकर यांनी मानले.