कलाकाराला दररोज परीक्षेचे आव्हान - वंदना गुप्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:14 AM2018-03-15T00:14:19+5:302018-03-15T00:14:42+5:30
प्रत्येक कलाकाराला दररोज परीक्षेला सामोरे जावे लागते. या परीक्षेत उत्तीर्ण व्हावेच लागते. यात नापास होऊन चालत नाही. कारण दुसऱ्याच दिवशी प्रयोगाच्या माध्यमातून पुन्हा परीक्षा द्यावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी कठोर परिश्रम घ्यावेत, असे आवाहन सुप्रसिद्ध सिनेकलावंत वंदना गुप्ते यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : प्रत्येक कलाकाराला दररोज परीक्षेला सामोरे जावे लागते. या परीक्षेत उत्तीर्ण व्हावेच लागते. यात नापास होऊन चालत नाही. कारण दुसऱ्याच दिवशी प्रयोगाच्या माध्यमातून पुन्हा परीक्षा द्यावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी कठोर परिश्रम घ्यावेत, असे आवाहन सुप्रसिद्ध सिनेकलावंत वंदना गुप्ते यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागातर्फे आयोजित ४१ व्या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. अध्यक्षस्थानी प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर होते. यावेळी मंचावर कुलसचिव डॉ. साधना पांडे, वित्त व लेखाधिकारी डॉ. नंदकुमार राठी, विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर उपस्थित होते. यावेळी वंदना गुप्ते यांनी नाट्य क्षेत्रातील चढ-उतार मांडले. रंगमंचावर पहिली उडी धोकादायक असते. ती एकदा घेतली की, सगळ्या गोष्टी होत राहतात. पहिल्या नाटकाच्या प्रयोगावेळी दडपणात होते. तरीही मागील ४६ वर्षांच्या काळात तब्बल १२ हजार ६२९ प्रयोग रंगभूमीवर केव्हा केले, याचे कोडे उलगडत नसल्याचे गुप्ते म्हणाल्या. कलाकार हा आयुष्यभर विद्यार्थीच असला पाहिजे. त्याला प्रत्येक प्रयोगातून काहीतरी नवीन शिकायला मिळते. नाट्य क्षेत्रात आपण एकेक पायरी वर चढत असतो. ती कायम चढतच राहावी लागते. जेव्हा आपण पायरी चढण्याचे थांबतो अन् मला सगळे येते म्हणून खाली वाकून पाहतो, तेव्हा आपण संपलेलो असतो, हे प्रत्येक कलाकाराने लक्षात ठेवले पाहिजे, असेही वंदना गुप्ते यांनी स्पष्ट केले. शेवटी ‘झुंज’ नाटकातील प्रसिद्ध डायलॉग सादर करीत भाषणाचा शेवट केला. अध्यक्षीय समारोप प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी केला. यात त्यांनी नाट्यप्रेमींसाठी लागणाºया सर्व सोयी-सुविधा विद्यापीठ प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. जयंत शेवतेकर यांनी केले. यात त्यांनी महोत्सवाच्या ऐतिहासिकतेचा आढावा घेतला.
पाहुण्यांचा परिचय प्रा. स्मिता साबळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. राखी सलगर यांनी केले. आभार प्रा. सुनील टाक यांनी मानले.