मतविभाजन रोखणे आघाडीला आव्हान!
By Admin | Published: November 16, 2016 12:16 AM2016-11-16T00:16:15+5:302016-11-16T00:14:52+5:30
जालना : जालना नगर पालिका ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने शस्त्रे परजली
जालना : जालना नगर पालिका ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने शस्त्रे परजली असून, मतविभाजन टाळण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात आले आहे. एकूणच आघाडीच्या नेत्यांनी शस्त्रे परजली असून, गुरुवारपासून खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडण्यास सुरुवात होणार आहे.
जालना नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गत काही दिवसांत नाट्यमय घडामोडींना वेग आला. भाजपा आणि शिवसेनेने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर युतीने अपक्ष असलेल्या शकुंतला कदम यांना या पदासाठी उमेदवार म्हणून पुरस्कृत केले. त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांचा आत्मविश्वास दुणावला आहे. असे असले तरी अपक्ष उमेदवाराकडून मतांचे विभाजन होऊ नये, या दृष्टीने दोन्ही पक्षांच्या धुरिणांकडून निवडणुकीतील प्रचाराची रणनीती आखली जात आहे. जालना शहरात मुस्लिम आणि दलित मतांचा टक्का लक्षणीय आहे. याच आधारावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी राजकीय गणित जुळविली आहेत. तसेच पालिकेत गत पाच वर्षांत केलेली विकास कामे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले जात आहेत. सध्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकांतून आपापसातील मतभेद वा हेवेदावे बाजूला ठेवून एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले जात असले तरी दगाफटका होऊ नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना व भाजपाच्या पुरस्कृत उमेदवार शकुंतला कदम याही राजकीयदृष्ट्या अनुभवी असल्याने आघाडीचे नेते संधी घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. मतांचे गणित जुळविण्यात त्यांनीही सुरुवात केली असून, विविध राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. यातून समाजातील दलित व मुस्लिम बांधव आपल्याकडे खेचण्याचा त्यांचा प्रयत्न असून, यात त्यांना कितपत यश येते, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.
संगीता गोरंट्याल आणि शकुंतला कदम यांच्यातच थेट लढत होण्याची चिन्हे असून, प्रचारात कोणते मुद्दे उपस्थित होतात. मतदारांना ते कितपत पटतात, यावर यशअपयशाचे गणित अवलंबून राहणार आहे.
१७ नोव्हेंबर रोजी उमेदवारांना चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचारास सुरुवात होणार असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहे. त्यानंतर केवळ आठ दिवस प्रचाराचा झंझावात राहणार असून, उमेदवार प्रचारास सज्ज झाले आहेत.