जलजीवन मिशनसमोर अडचणी; डिसेंबरअखेरपर्यंत १,२४१ गावांना नळाने पाणी हे दिवास्वप्नच

By विजय सरवदे | Published: July 19, 2023 11:29 AM2023-07-19T11:29:41+5:302023-07-19T11:30:11+5:30

‘जलजीवन मिशन’ या योजनेतून सन २०२४ मध्ये नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी प्रतिदिन प्रतिमाणशी किमान ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याचा शासनाचा उद्देश आहे.

Challenges facing Jaljeevan mission; By the end of December, tap water for 1,241 villages is a dream | जलजीवन मिशनसमोर अडचणी; डिसेंबरअखेरपर्यंत १,२४१ गावांना नळाने पाणी हे दिवास्वप्नच

जलजीवन मिशनसमोर अडचणी; डिसेंबरअखेरपर्यंत १,२४१ गावांना नळाने पाणी हे दिवास्वप्नच

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात ग्रामीण भागातील चार लाख ८७ हजार ९११ घरांना नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे जलजीवन मिशनचे उद्दिष्ट आहे. तथापि, अडथळ्यांची शर्यत पार करत जि.प. पाणीपुरवठा विभागाची घोडदौड सुरू असली तरी डिसेंबर २०२३ अखेपर्यंत या योजनेचे उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता धुसर झाली आहे. प्रामुख्याने सातत्याने पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागणाऱ्या १,२४१ गावांना ‘जलजीवन मिशन’ या योजनेतून सन २०२४ मध्ये नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी प्रतिदिन प्रतिमाणशी किमान ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याचा शासनाचा उद्देश आहे. यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात १,१६१ योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये कमीत कमी २५ हजार लिटर क्षमतेपासून जास्तीत जास्त एक लाख लिटरपर्यंत सुमारे सव्वाआठशे जलकुंभ (पाण्याची टाकी), तलाव परिसरात २५० विहिरी, विहिरीपासून टाकीपर्यंत जलवाहिनी व घरापर्यंत नळजोडणी या कामांचा समावेश आहे.

मात्र, या सरकारी योजनेला सरकारी कार्यालयांकडूनच खोडा घातला असल्यामुळे ही योजना थोडी बॅकफूटवर गेली. तलाव परिसरापासून २०० मीटर क्षेत्रात विहीर घेण्यास सिंचन विभागाने आडकाठी निर्माण केली. त्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सचिवालयापर्यंत संपर्क साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्यापही त्यास लेखी स्वरूपात परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे जि.प. यंत्रणेने २०० मीटरच्या आत विहिरींची कामे सुरू केली आहेत. दुसरीकडे, या योजनेचे काम थेट जि.प. पाणीपुरवठा विभागामार्फतच राबविण्यात येत असल्यामुळे काही सरपंच दुखावले गेले आहेत. काहींनी टक्केवारीसाठी कंत्राटदारांकडे आग्रह धरला. काहीजण गरज नसेल, तेथे जीआय पाइपसाठी अडून बसले, त्यामुळे अनेक गावांमध्ये कामे थांबली. त्यामुळे ‘सीईओ’ मीना यांनी अशा सरपंचांना संपर्क साधून कामांना अडथळा आणू नये, अशी विनंती केली. तरीही काहींनी विरोध कायम ठेवला. अशा सरपंचांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मार्च २०२४ पर्यंत सर्वांना पाणी
यासंदर्भात जि.प. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी सांगितले की, सध्या सर्व अडथळ्यांवर मात करत योजनेची कामे प्रगतिपथावर आहेत. शासनाने डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत योजना मार्गी लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरीदेखील मार्च २०२४ पर्यंत ही योजना परिपूर्णपणे यशस्वी होईल.

- १,२४१ गावांसाठी ‘जलजीवन मिशन’ योजना
- १,१६१ कामांचा अंतर्भाव
- ५३ गावांना आतापर्यंत नळजोडणीद्वारे पाणीपुरवठा सुरू
- ६७७ कोटी सात लाखांचा अंदाजे खर्च
- चार लाख ८७ हजार ९११ घरांना नळाद्वारे पाणी देण्याचे उद्दिष्ट
- तीन लाख ६४ हजार १६५ घरांना आजपर्यंत नळजोडणी

Web Title: Challenges facing Jaljeevan mission; By the end of December, tap water for 1,241 villages is a dream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.