‘बंडोबां’ना थंडोबा करण्याचे उमेदवारांपुढे आव्हान !

By Admin | Published: September 29, 2014 12:05 AM2014-09-29T00:05:47+5:302014-09-29T00:42:21+5:30

संजय तिपाले , बीड युती, आघाडीतील फाटाफुटीने बहुरंगी लढती आहेत़ त्यामुळे इच्छुकांच्या आशा- आकांक्षा वाढल्या आहेत़ जिल्ह्यात सर्वच पक्षांना बंडखोरीची लागण झाली आहे़ बंडोबांना थंडोबा करण्याचे

Challenges to thwart 'Bandoban' | ‘बंडोबां’ना थंडोबा करण्याचे उमेदवारांपुढे आव्हान !

‘बंडोबां’ना थंडोबा करण्याचे उमेदवारांपुढे आव्हान !

googlenewsNext


संजय तिपाले , बीड
युती, आघाडीतील फाटाफुटीने बहुरंगी लढती आहेत़ त्यामुळे इच्छुकांच्या आशा- आकांक्षा वाढल्या आहेत़ जिल्ह्यात सर्वच पक्षांना बंडखोरीची लागण झाली आहे़ बंडोबांना थंडोबा करण्याचे आव्हान आता उमेदवारांंपुढे राहणार आहे़ बंडाच्या झेंड्याने अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे़ त्यामुळे मनधरणीचे काम मोठ्या खुबीने सुरु आहे़
स्वतंत्र लढतींमुळे सर्वांनाच आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे़ त्यानुषंगाने प्रत्येक पक्ष ताकदीने आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहे़ दरम्यान, उमेदवारी मिळेल या आशेने प्रचारात उतरलेल्या काही नेत्यांचे पक्षाने तिकिट कापले़ त्यांच्याजागी दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या नेत्यांना संधी दिली़ त्यामुळे निष्ठावंतात उफाळलेली नाराजी बंडाच्या रुपातून पुढे आली़ ‘आतल्या खेळ्या’ माहीत असलेला शिलेदार लढाईच्यावेळी शत्रूपक्षासोबत जाणे महागात पडेल याची सर्वांनाच जाणिव आहे़ त्यामुळे बंडाचा झेंडा घेऊन उभ्या असलेल्या संबंधितांचे चोचले पुरविण्याची तयारी प्रमुख उमेदवार दर्शविताना दिसत आहेत़ काहींनी पत्ता कट होताच दुसऱ्या पक्षाशी जुळवून घेत त्यांची उमेदवारी मिळविली आहे तर काहींनी अपक्ष म्हणून रणांगणात उडी घेतली आहे़ त्यामुळे बंड कोणाच्या पथ्यावर पडते व कोणाला खिंडीत गाठते ? हे पाहणे रोमांचक ठरत आहे़
राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांच्यासाठी खुद्द शरद पवार धावून आले; पण जिल्हाध्यक्ष अशोक डक, अ‍ॅड़ एकनाथ आव्हाड, अच्यूत लाटे, मोहनराव जगताप हे नेते प्रचारात नाहीत़ नगरसेवक सहाल चाऊस यांनी चोवीस तासातच राष्ट्रवादीतून काँग्रेस व पुन्हा काँग्रेसमधून राष्ट्रवादी असे वर्तुळ पूर्ण केले आहे़ मनसेने डॉ़ भगवान सरवदेंना उमेदवारी दिली;पण महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा फड यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली़ भाई थावरेंनीही बंड पुकारले आहे़ राष्ट्रीय क्रांती सेनेचे परमेश्वर मुंडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे़ हे दोघेही आऱ टी़ देशमुख यांच्या अडचणी वाढवू शकतात़
येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार जयदत्त क्षीरसागर रणांगणात आहेत़ राष्ट्रवादीचे दोघे विनायक मेटेंसोबत गेले तर मुकर्रमजान पठाण यांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष म्हणून येणे पसंत केले़ क्षीरसागरांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक असलेल्या नगरसेवक सुभाष सपकाळ यांनी महायुतीचा गुलाल कपाळावर लावत राष्ट्रवादीला खिंडार पाडले़ काँग्रेसकडून माजी आ़ सिराजोद्दीन देशमुख यांची उमेदवारी आहे़ काँग्रेसचे नेते बाळासाहेब जटाळ, जिल्हा सरचिटणीस दिलीप भोसले यांनी उमेदवारी दाखल करुन त्यांची अडचण केली आहे़ सेनेतही याहून वेगळी स्थिती नाही़ उपजिल्हाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य गणेश वरेकरांनी अपक्ष उमेदवारी दाखल करुन अनिल जगतापांची गोची केली होती़ विनायक मेटेंसोबत जाऊनच त्यांचे बंड थांबले़ वरेकरांनी केलेल्या बंडाने शिवसेनेला जोराचा धक्का बसला आहे़
भाजपाने माजी आ़ भीमराव धोंडे यांना उमेदवारी दिली़ ऐनवेळी उमेदवारी कापल्यामुळे बाळासाहेब आजबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन धोंडेंची अडचण वाढविली आहे़ भाजपात असलेले माजी आ़ साहेबराव दरेकर यांनीही अपक्ष उमेदवारी भरली आहे़ आजबे यांनी फडणविसांचे पद दिले तरीही आता माघार नाही, अशा शब्दात भाजपला फटकारले आहे़
येथे भाजपाने प्रा़ संगीता ठोंबरे यांच्यावर विश्वास दाखवला़ भाजपाच्या इच्छूक उमेदवारांत ज्यांचे नाव चर्चेत होते त्या अंजली घाडगे यांनी बंड पुकारत काँग्रेसवासी होणे पसंत केले़ त्यांनी आता ठोंबरे यांना ‘हात’ दाखविण्यासाठी ताकदीनिशी रणांगणात उडी मारली आहे़ बाबूराव पोटभरे हे देखील येथून इच्छूक होते़ मात्र, त्यांना डावलल्याने त्यांची भूमिका लक्षवेधी ठरत आहे़ राष्ट्रवादीचे संजय होळकर, रिपाईचे संदिपान हजारे, विष्णू जोगदंड यांनीही बंडाचे निशान झळकावले आहे. त्यामुळे भाजपच्या संगीता ठोंबरेंची तसेच राष्ट्रवादीच्या नमिता मुंदडा यांचीही अडचण झाली आहे़

Web Title: Challenges to thwart 'Bandoban'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.