गुन्हेगारी, धार्मिक तणाव थांबवण्याचे आव्हान; पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वीकारला पदभार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 12:06 PM2024-06-28T12:06:27+5:302024-06-28T12:07:14+5:30
नवनियुक्त पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दुपारी आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारला.
छत्रपती संभाजीनगर : शहरात वाढलेली गुन्हेगारी, ठिकठिकाणी भूमाफियांची गुंडगिरी, लुटमारीसारखे गंभीर गुन्हे थांबवण्याचे आव्हान नवनियुक्त पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासमोर असेल. गेल्या वर्षभरात शहरात कथित गावगुंडांनी तोंड वर काढल्याने त्यांच्यावरही आयुक्त पवार कसे वचक निर्माण करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. पवार यांनी दुपारी आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी बराच वेळ अन्य अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला.
तत्कालीन आयुक्त मनोज लोहिया यांच्या सेवानिवृत्तीनंतर राज्य शासनाने नक्षली विरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे शहराच्या पोलिस आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सोपवला होता. पाटील यांनी झपाट्याने काम सुरू केल्याने त्यांच्याच पूर्णवेळ नियुक्तीची चर्चा होती. मात्र, शासनाने पुण्याचे सहआयुक्त प्रवीण पवार यांची पूर्णवेळ आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. बुधवारी पवार यांना पुणे पेालिसांनी निरोप दिला. त्यानंतर गुरुवारी सकाळी पवार शहरात दाखल झाले. दुपारी १.३० वाजता मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांनी पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारला.
गुन्हेगारी, धार्मिक तणाव थांबवण्याचे आवाहन
गेल्या पाच महिन्यांमध्ये लुटमार, चोऱ्या, घरफोड्यांच्या घटनांनी विक्रम रचला आहे. १३७ घरफोड्या, ४८७ वाहन चोऱ्या, तर ८१ नागरिकांना लुटले गेले. यातील बोटांवर मोजण्याइतक्याच घटनांमध्ये पोलिस गुन्हेगारांचा शोध लावू शकले. पोलिस ठाण्यांमधील डीबी पथके ‘अर्थपूर्ण’ कामातच गुंतली असल्याने गुन्हेगारांवरचा वचकदेखील संपला आहे. त्यामुळे सुस्तावलेल्या डीबी पथकांना सरळ करून गुन्हेगारी आटोक्यात आणून धार्मिक तणाव हाताळण्याचे मोठे आव्हान नवनियुक्त आयुक्त पवार यांच्यासमोर आहे.
कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य द्या
पवार यांनी सायंकाळी शहराचे पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्तांसह सर्व ठाणे प्रभारींची बैठक घेतली. यात त्यांनी शहरातील पोलिसांच्या कामकाजाचा आढावा घेतला. शिवाय, त्यांना अपेक्षित कामाच्या शैलीविषयीदेखील स्पष्ट सूचना केल्या. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांची सर्वाधिक कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य राहायला हवे, अशी सक्त सूचनाच त्यांनी केली. ठाण्यांमधील सर्व संसाधने व्यवस्थित ठेवा, पोलिसांचे दैनंदिन काम जसे की रेकॉर्ड सांभाळणे, गुन्हेगारांवर पाळत ठेवणे, प्रतिबंधात्मक कारवाया हे वेळेवर पार पडले पाहिजे. पोलिस कुठेही कमी पडता कामा नये, अशी ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.