पुण्याचा संघ ठरला चॅम्पियन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:10 AM2018-02-20T01:10:53+5:302018-02-20T01:11:13+5:30
: गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सोमवारी झालेल्या फायनलमध्ये पुणे संघाने अलॉफ्ट डेकोरेटर संघावर तब्बल ८१ धावांनी मात करताना औरंगाबाद इन्स्टिट्यूट आॅफ क्रिकेटतर्फे आयोजित अखिल भारतीय निमंत्रित संघांची क्रिकेट स्पर्धा जिंकली. ऋषभ राठोड हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
औरंगाबाद : गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सोमवारी झालेल्या फायनलमध्ये पुणे संघाने अलॉफ्ट डेकोरेटर संघावर तब्बल ८१ धावांनी मात करताना औरंगाबाद इन्स्टिट्यूट आॅफ क्रिकेटतर्फे आयोजित अखिल भारतीय निमंत्रित संघांची क्रिकेट स्पर्धा जिंकली. ऋषभ राठोड हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
पुणे संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १५९ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून ऋषभ राठोड याने स्फोटक फलंदाजी करताना ५५ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ७१ धावांची वादळी खेळी केली. मधुर पटेलने १७ चेंडूंत एक षटकार व २ चौकारांसह २३, तर अभिनव पुरी व यश नहार यांनी प्रत्येकी १७ धावांचे योगदान दिले. अलॉफ्ट डेकोरेटर संघाकडून बबलू पठाण आणि सय्यद ए. यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. सय्यद तल्हा, सुशील अरक, मोहमद इम्रान व अझीम कुरैशी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात अलॉफ्ट डेकोरेटर संघ १६.१ षटकांत ७८ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून अब्दुल कय्यूम (१४) व सय्यद जावेद (११) हेच दुहेरी आकडी धावा फटकावू शकले. पुणे संघाकडून शुभम कोठारी, पुनित त्रिपाठी यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. विशाल गीतेने १६ धावांत २ गडी बाद केले. त्याआधी सकाळी झालेल्या उपांत्य फेरीत पुणे संघाने सौराष्ट्र लॉयन्स संघाचा ४ गडी राखून पराभव करीत अंतिम फेरी गाठली. या लढतीत सौराष्ट्र लॉयन्सने प्रथम फलंदाजी करीत १९ षटकांत सर्वबाद १६५ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून विशाल जोशी याने ३९ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह ७७ व कृष्णा पाठकने १९ धावांचे योगदान दिले. पुणे संघाकडून विशाल गीतेने २३ धावांत ५ गडी बाद केले. प्रसाद पाटील व पुनित त्रिपाठी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात पुणे संघाने विजयी लक्ष्य १८ षटकांत ६ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून पुनित त्रिपाठीने ३७ चेंडूंत ५ षटकार व ७ चौकाारंसह नाबाद ७४ धावा केल्या. आशिष सूर्यवंशीने १५ चेंडूंत २ षटकार व एका चौकारांसह २७, अनिकेत पोनवालने १७ चेंडूंत एक षटकार व ३ चौकारांसह २४ धावांचे योगदान दिले. सौराष्ट्र लायन्सकडून भावेश डोंगा व धवल सोनी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. या स्पर्धेत औरंगाबादचा सय्यद अरीज मालिकावीर किताबाचा मानकरी ठरला, तर मोहंमद आमेरने सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार जिंकला.
अंतिम सामन्यानंतर एआयओसीचे सरताज खान, नावीद हुसेन, तनवीर हुसैन, मुजाहेद व एजाज झैदी यांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले.