औरंगाबादमध्ये चाँदभाई बनवताहेत ५५ फुटी रावण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 07:11 PM2018-10-09T19:11:25+5:302018-10-09T19:12:29+5:30
रावणाचे महाकाय रूप साकारण्यासाठी खास उत्तर प्रदेशातील चाँदभाई व त्यांचे सहकारी मागील १० दिवसांपासून शहरात वास्तव्याला आले आहेत.
औरंगाबाद : नवरात्रोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याच वेळी दुसरीकडे विजयादशमीचीही तयारी सुरू झाली आहे. यंदा ५५ फूट व ४५ फूट उंचीचे दोन रावण तयार होत आहेत. रावणाचे महाकाय रूप साकारण्यासाठी खास उत्तर प्रदेशातील चाँदभाई व त्यांचे सहकारी मागील १० दिवसांपासून शहरात वास्तव्याला आले आहेत.
मनामनातून दुष्टप्रवृत्तीचा नाश करण्यासाठी विजयादशमीच्या दिवशी रावणरुपी पुतळ्याचे दहन केल्या जाते. यासाठी रावणाचा महाकाय पुतळा तयार केला जातो. तो एका दिवसात तयार होत नाही. एवढेच नव्हे तर बांबू, कागदापासून पुतळे तयार करण्यासाठी खास या क्षेत्रातील एक्स्पर्टची मदत घेतल्या जाते. रावण बनविण्यात हातखंडा असलेल्या उत्तर प्रदेशातील बुुलंद जिल्ह्यामधील दानपूर या गावातून चाँदभाई मागील १८ वर्षांपासून औरंगाबादेत येत आहेत. सिडको एन-७ येथील रामलीला मैदानावर २५ सप्टेंबरपासून रावण बनविण्यास सुरुवात झाली आहे.
एकाच ठिकाणी दोन रावण बनविण्यात येत आहे. यातील ५५ फूट उंचीचा रावण सिडकोत, तर ४५ फुटांचा रावण वाळूज महानगरसाठी तयार केला जात आहे. दोन्ही पुतळे इको फ्रेंडली आहेत. यासाठी ५०० बांबूचा वापर करण्यात येत आहे. याशिवाय वस्त्र, पेपरचा वापर करण्यात येणार आहे. रावण तयार करण्यासाठी २० दिवस लागतात. विजयादशमीच्या आदल्या रात्री रावणाच्या शरीराचे सर्व भाग जोडण्याचे काम सुरू होते व सकाळी क्रेनच्या साह्याने १० डोक्यांचा भाग देहावर बसविला जातो. यासाठी चाँदभाई यांना प्रकाशचंद, कुलदीप वर्मा, राहुलराज, प्रेमपाल, हुसेन अली, सद्दाम अली व इरफानभाई सहकार्य करीत आहेत.
रावणदहन होताना पाहावत नाही
चाँदभाई म्हणतात, एक रावण तयार करण्यासाठी २० ते २५ दिवसांचा कालावधी लागतो. यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतलेली असते. विजयादशमीच्या दिवशी अवघ्या ५ ते १० मिनिटांत जेव्हा हा पुतळा जळून खाक होतो तेव्हा पाहावले जात नाही. मात्र, दुष्टप्रवृत्तींचा नाश व्हायलाच पाहिजे, त्याचे हे प्रतीकात्मक रावणदहन होय. रावणदहन करून आबालवृद्ध जेव्हा आनंदित होतात तेव्हा आमचेही मन प्रसन्न होते, असेही त्यांनी नमूद केले.