खैरेंच्या हातीच होता पालिकेचा रिमोट कंट्रोल;आम्ही सत्तेत सोबत असताना निर्णय घेऊ देत नव्हते
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 02:57 PM2022-05-23T14:57:43+5:302022-05-23T14:58:21+5:30
मनपात शिवसेनेसोबत सत्तेत असताना भाजपने महापौर, उपमहापौर, सभापती पदे भोगलीच आहेत. त्यावेळी त्यांना पाणीपुरवठा प्रश्न आठवला नाही काय, असा टोला शिवसेनेने लगावला.
औरंगाबाद : शिवसेनेचे माजी खा. चंद्रकांत खैरे, आ. अंबादास दानवे हे वारंवार भाजप आमच्यासोबत सत्तेत होता, अशी दवंडी देत आहेत. आम्ही जरी कालपर्यंत त्यांच्यासोबत सत्तेत होतो, तरीही महापालिकेचा रिमोट कंट्रोल खैरेंच्या हाती होता. पूर्ण सत्तेच्या काळात सभागृह नेता शिवसेनेचाच होता. त्यामुळे सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकांची आधी खैरे त्यांच्या धोरणानुसार चाळणी करायचे, मग उरलेले विषय सभागृहात मंजूर व्हायचे. या सगळ्यात पाणीपुरवठ्यासह अनेक योजनांची माती शिवसेनेनेच केल्याचा आरोप रविवारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी केला.
२३ मे रोजी सायंकाळी ४ वा. शहरातील पाणीपुरवठ्याच्या समस्येवरून पैठण गेट ते महापालिका असा जल आक्रोश मोर्चा भाजप काढणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपत सध्या आरोप-प्रत्यारोपांचा पलटवार सुरू आहे. मनपात शिवसेनेसोबत सत्तेत असताना भाजपने महापौर, उपमहापौर, सभापती पदे भोगलीच आहेत. त्यावेळी त्यांना पाणीपुरवठा प्रश्न आठवला नाही काय, असा टोला शिवसेनेने लगावला.
त्यावर उत्तर देताना डॉ. कराड यांनी खैरे हेच महापालिका चालवित होते. त्यांच्या सहमतीविना कोणतीही विषय पत्रिका मंजूर हाेत नव्हती. यातूनच समांतर जलवाहिनीचे वाटोळे झाले. नवीन पाणीपुरवठा योजनादेखील हे आणखी दहा वर्षे होऊ देणार नाहीत. भाजप आजवर नागरिकांच्याच बाजूने राहिली आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत सत्तेत असतानाही वारंवार पाणीपुरवठ्यावरून पक्ष नगरसेवकांनी आंदोलने केली. १,६८० कोटींच्या योजनेचे काम संथ गतीने होत असल्याने आम्ही शिवसेनेशी युती तोडून मनपा सत्तेतून बाहेर पडल्याचेही कराड म्हणाले. यावेळी आजवर भाजपाने मनपासह शहरात पाणीपुरवठ्यासाठी केलेल्या आंदोलनाचा आढावा घेणारी माजी नगरसेवक नितीन चित्ते यांनी तयारी केलेली पुस्तिका प्रकाशित केली.