नाना पटोलेंनी सुनावताच कॉंग्रेस फुटणार म्हणणाऱ्या चंद्रकांत खैरेंनी मागितली माफी
By बापू सोळुंके | Published: November 5, 2022 08:17 PM2022-11-05T20:17:46+5:302022-11-05T20:18:12+5:30
शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याच्या ठाकरे गटाच्या याचिकेवर लवकरच निर्णय येणार आहे. याविषयी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी वक्तव्य केले होते
औरंगाबाद : शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरल्यास आपले सरकार कसे टिकवायचे, हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगले माहीत आहे. काँग्रेसचे २० ते २२ आमदार त्यांनी तयार ठेवले आहेत, असा गौप्यस्फोट करणारे विधान शिवसेना नेते माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी करताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खैरे यांचा समाचार घेत ज्यांना स्वत:चा पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी इतरांची काळजी करू नये, अशी बोचरी टीका केली. पटोले नाराज झाल्याचे कळताच खैरे यांनी त्यांचे विधान मागे घेत सपशेल माफी मागितली.
शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याच्या ठाकरे गटाच्या याचिकेवर लवकरच निर्णय येणार आहे. याविषयी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा संदर्भ देत म्हटले होते की, १६ आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय आल्यास सरकार कसे टिकवायचे, हे फडणवीसांना चांगले माहीत आहे. त्यांनी काँग्रेसचे २०-२२ आमदार तयार ठेवले असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यांच्या विधानाचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खरपूस समाचार घेतला. ज्यांना स्वत:चा पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी इतरांची काळजी करू नये, असे सुनावले. यानंतर खैरे यांनी सपशेल माघार घेत २०-२२ आमदारांसंदर्भात केलेले विधान मागे घेत दिलगिरी व्यक्त केली. याविषयी खैरे म्हणाले की, माझ्या विधानामुळे पटोले नाराज झाले. ते महाविकास आघाडीचे नेते आहेत. भाजप हे फोडाफोडीचे राजकारण करत असते. यामुळे काँग्रेस पक्षाला सजग करण्यासाठी आपण हे विधान केले होते. परंतु, पटोले नाराज झाल्याने आपण दिलगिरी व्यक्त केली.