Chandrakant Khaire: "फडणवीस मुख्यमंत्री असताना संभाजीनगर नामांतरणासाठी मी 100 वेळा भेटलो"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 07:47 PM2022-05-17T19:47:48+5:302022-05-17T19:47:57+5:30
औरंगाबाद शहरातील जालना रोडवरील एका हॉटेलच्या सभागृहात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर उत्तरे आणि माहिती दिली.
औरंगाबाद - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यावरुन जाहीर सभेत भूमिका मांडली. त्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत खैरेंवर टिका केली. संभाजीनगर नामांतराचे आता विसरा, जोपर्यंत भाजपचे सरकार येत नाही, तोपर्यंत संभाजीनगर होत नाही, असेच त्यांनी म्हटले. त्यावरुन, आता चंद्रकांत खैरे यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. आपण मुख्यमंत्री असताना मी किमान शंभर वेळा आपणास भेटलो, मग का झालं नाही? असंही ते म्हणाले.
औरंगाबाद शहरातील जालना रोडवरील एका हॉटेलच्या सभागृहात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर उत्तरे आणि माहिती दिली. शहरातील पाणी प्रश्न लवकरच सोडविणार असून या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या पाईपलाईनचे काम विविध पातळीवरती सुरू आहे. सदरील पाईपलाईनचे काम लवकरच पूर्ण होईल आणि शहराचा 100% पाणीप्रश्न सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरातील पाणी प्रश्न बिकट असला तरी महानगरपालिकेने सदरील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आल्या असून त्या माध्यमातून शहरातील अनेक भागाचा पाणीप्रश्न सुटला आहे.
मी फडणवीसांना 100 वेळा भेटलो
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासंदर्भात बोलताना खैरे म्हणाले की देवेंद्र फडवणीस हे मोठे नेते असून त्यांनी बोलताना एकेरी शब्दांचा वापर करू नये. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यासाठी मी भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना किमान शंभर वेळा भेटलो, याचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत, असेही खैरेंनी म्हटले.
जलील यांना बोलण्याची अक्कल नाही
पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना खैरे म्हणाले की, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना बोलण्याची अक्कल नाही, कोणाबद्दल आपण काय बोलतो याचं भान त्यांना राहत नाही. औरंगाबादचा विकास साधण्यात त्यांना अपयश आलं आहे. औरंगाबाद शहरातील सर्व समाजातील नागरिक त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराज असून याची जाणीव खासदार इम्तियाज जलील यांना झाली आहे.