चंद्रकांत खैरे शिवसेनेचे आउट डेटेड मॉडेल; संदीप देशपांडेंचा जोरदार प्रतिहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 01:59 PM2022-04-30T13:59:48+5:302022-04-30T14:03:49+5:30
उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने विरोधकांना फटकारले आहे यातून विरोधकांनी बोध घ्यावा.
औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आम्ही मनसेच्या सभेकडे आम्ही लक्ष देत नाहीत, अशी टीका शुक्रवारी केली होती. यावर आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी, खैर म्हणजे शिवसेनेचे आउट डेटेड मॉडेल आहेत असे जोरदार प्रत्युत्तर दिले. विरोधकांनी विरोध करत रहावा आम्ही आमच्या मार्गाने पुढे जात राहू, असा निश्चय देशपांडे यांनी व्यक्त केला. ते राज ठाकरे यांच्या सभेसाठी औरंगाबादमध्ये आले आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे पुण्याहून संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन औरंगाबादकडे निघाले आहेत. आज दुपारी तीन वाजेपर्यंत ते शहरात दाखल होतील. दरम्यान, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्या १ मे रोजी होणाऱ्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी मनसेचे अनेक नेते शहरात दाखल झाले आहेत. सभेला होणारा विरोध, विरोधी पक्षांची टीका याचा मनसेचे संदीप देशपांडे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, लोकशाही मार्गाने विरोध करावा, पण उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने विरोधकांना फटकारले आहे यातून विरोधकांनी बोध घ्यावा. आम्ही आमच्या मार्गाने पुढे जात राहू. राज ठाकरे यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे विरोधकांना धक्का बसला आहे, असेही देशपांडे म्हणाले.
यासोबतच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना देशपांडे यांनी ते शिवसेनेचे आउट डेटेड मॉडेल असल्याचे म्हणत शिवसेनेवर प्रतिहल्ला केला. शिवसेनेचे स्वतःचे पहावे, रोज का बोलताय जनता आमच्या बाबतीत निर्णय घेईल ,शिवसेना का मधे पडत आहे, असा सवाल देशपांडे यांनी केला. राज ठाकरे यांच्या सभेला मिळणाऱ्या सभेला जो प्रतिसाद मिळत आहे यावरून मनसेचे भवितव्य उज्वल आहे. भाजपसोबत युतीचा त्यांच्याकडून किंवा आमच्याकडून अद्याप कोणताही प्रस्ताव नाही असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले.