हा चंद्रकांतच त्या चंद्रकांतला हद्दपार करील; कोणी दिले कोणाला आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 07:23 PM2020-03-02T19:23:44+5:302020-03-02T19:26:25+5:30
शिवसेनाप्रमुखांच्या करिश्म्यामुळे भाजपने शिवसेनेचे बोट धरून युती केली.
औरंगाबाद : शहरातील ३२ वर्षांच्या राजकारणात भाजप शिवसेनेचे बोट धरून मोठा झालेला पक्ष. सुरुवातीला एकही नगरसेवक निवडून न आलेल्या या पक्षाने आमच्या जीवावर शहरातील राजकारणात प्रवेश केला आणि आता हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शिवसेनेला हद्दपार करण्याची भाषा करीत आहेत. चंद्रकांत खैरेच चंद्रकांत पाटलांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रत्युत्तर माजी खासदार खैरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले.
आजवर कुठे होते हे पाटील, असा सवाल करीत खैरे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांच्या करिश्म्यामुळे भाजपने शिवसेनेचे बोट धरून युती केली. मनपात विविध पदे भोगली. डॉ. भागवत कराड कुणामुळे महापौर झाले, याचा विसर त्यांना पडला असेल. उपमहापौरपदाचा राजीनामा दिला, तसा स्थायी समिती सभापतीपदाचा का दिला नाही. हर्सूलची निविदा कुणी कशासाठी दाबून ठेवली, हे सर्वांना माहिती आहे. समांतर जलवाहिनीच्या कामात भाजपने विघ्न आणले. नसता ती योजना पूर्ण झाली असती. आमची तत्त्वे बदललेली नाहीत. त्यामुळे हद्दपार कोण होणार हे येणारा काळच सांगेल असेही खैरे म्हणाले.