ध्येयवेडातूनच परिवर्तन शक्य- दराडे
By Admin | Published: January 17, 2016 11:47 PM2016-01-17T23:47:56+5:302016-01-17T23:56:55+5:30
औरंगाबाद : एखादा शंभर टक्के ध्येयवेडा माणूस समाजात परिवर्तन घडवून आणू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने मोठे ध्येय समोर ठेवून काम केले, तर खूप चांगले काम सहज उभे राहू शकते,
औरंगाबाद : एखादा शंभर टक्के ध्येयवेडा माणूस समाजात परिवर्तन घडवून आणू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने मोठे ध्येय समोर ठेवून काम केले, तर खूप चांगले काम सहज उभे राहू शकते, असे प्रतिपादन ख्यातनाम शास्त्रज्ञ व समाजसेवक बाळासाहेब दराडे यांनी रविवारी येथे केले.
टेंडर केअर होम आणि इन्स्टिट्यूट आॅफ सायकॉलॉजिकल हेल्थ यांच्यातर्फे सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात झालेल्या ‘वेध’ या व्यवसाय प्रबोधन परिषदेत ते बोलत होते. ‘गरज की चैन’ हे सूत्र असलेल्या परिषदेत दराडे यांच्यासह मनपाचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, उद्योजक सुनील रायठठ्ठा, पारधी समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत शिक्षक मतीन भोसले, पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या मानसी करंदीकर आणि केतकी घाटे या मान्यवरांनी अनुभव कथनातून आपला जीवनपट उलगडला. मनोविकार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी या मान्यवरांसोबत खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधला.
आपले शिक्षण, अमेरिकेतील करिअर, नासाबरोबर केलेले कार्य, अमेरिकेतून परतल्यानंतर ग्रामविकासाच्या कार्यात झोकून देऊन केलेले काम, याबाबत दराडे यांनी मनमोकळा संवाद साधला. ‘देशासाठी काही करायचे असल्यास त्यासाठी मोठ्या बुद्धिमत्तेची नव्हे, तर शुद्ध हृदयाची गरज आहे,’ असेही दराडे यांनी स्पष्ट केले. निसर्ग, पर्यावरणाचे संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही करिअर व कामाचा भाग म्हणून स्वीकारली आहे. त्यातूनच आम्हाला जीवनाचा खरा अर्थ आणि आनंदही प्राप्त झाल्याचे मानसी करंदीकर, केतकी घाटे यांनी सांगितले. फासेपारधी समाजाने मुख्य प्रवाहात यावे या हेतूने त्यांच्या पाल्यांसाठी विशेष शाळा सुरूकरणाऱ्या भोसले यांनीही आपला जीवनप्रवास उलगडला. कुटुंबियांसोबत छान गप्पा मारणे, हे मला आॅस्करपेक्षाही जास्त महत्त्वाचे वाटते, अशा शब्दांत मृण्मयीने आपल्या भावना व्यक्त केल्या. उद्योगाचे यश व कीर्ती हा सामाजिक ठेवाच असून, त्यामुळेच कामगार-कर्मचाऱ्यांना नफ्यामध्ये वाटा देण्याची पद्धत सुरू केल्याचे रायठठ्ठा यांनी नमूद केले.