मराठा आरक्षणासाठी कायदा बदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:41 AM2018-05-30T00:41:58+5:302018-05-30T00:44:15+5:30
‘आम्ही भीक मागत नाहीत. आम्हाला आरक्षण हवे आहे. ते कायदा बदलून सर्वोच्च न्यायालय देऊ शकते,’ असा आशावाद आज येथे गुजरातचे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘आम्ही भीक मागत नाहीत. आम्हाला आरक्षण हवे आहे. ते कायदा बदलून सर्वोच्च न्यायालय देऊ शकते,’ असा आशावाद आज येथे गुजरातचे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी व्यक्त केला.
राजीव गांधी स्टेडियमवर आयोजित अ.भा. छावाच्या ११ व्या अधिवेशनात ते प्रमुख भाषण करीत होते. भाषणाच्या प्रारंभीच पटेल यांनी ‘जय भवानी जय शिवाजी’ हा नारा मुंबई आणि दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे, असे म्हणत वारंवार सर्वांकडून म्हणवून घेतला. या अधिवेशनात हार्दिक पटेल यांना मराठा मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मराठा, पाटीदार, कुर्मी, जाट हे सारे एकच आहेत. मी स्वत:ला मराठाच समजतो. आम्ही एससी, एसटी, ओबीसींचे अधिकार हिरावून घेऊ इच्छित नाहीत; पण मराठ्यांवरच अन्याय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पटेल यांनी घणाघाती टीका केली. आतापर्यंतचे मुख्यमंत्री पाहा कोण होते ते? मग आताच हा नागपूरवाला कसा काय मानगुटीवर बसला. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला त्याकाळी नकार दिला, त्यांंना आता आपल्यावर राज्य करायचा अधिकार नाही, असे उद्गार हार्दिक पटेल यांनी काढताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
पटेल म्हणाले, जो जगाचा पोशिंदा आहे, त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. तो गरिबीत खितपत पडला आहे. त्याचा कुणी वाली राहिलेला नाही. आपण यापुढे या राजकारण्यांचे गुलाम का व्हायचे? नाशिकच्या शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? आता आपण सगळे मिळून धडा शिकवूया.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही नाव न घेता पटेल यांनी टीकेची झोड उठवली. कुठे आहे स्वतंत्र विदर्भ? कुठे आहे शिवरायांचे स्मारक? नुसती आश्वासने? आता आपण चुकीच्या लोकांना निवडून देणे थांबवले पाहिजे. हिंदूंचा ठेका तर जणू मराठा, पाटीदार, कुर्मी आणि जाटांनीच घेतलाय? प्रत्येक ठिकाणी लढायला आपणच पुढे होतो. इकडे आपण लढत राहतो आणि सत्तेची वेळ येते तेव्हा नागपूरवाला डोक्यावर येऊन बसतो.
विविध ठराव
या अधिवेशनात विविध ठराव मंजूर करण्यात आले. ते असे : मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळालेच पाहिजे, अॅट्रॉसिटी कायदा संपूर्णत: रद्द झालाच पाहिजे, शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतीपंपाला मोफत वीज मिळालीच पाहिजे, संपूर्ण दारूबंदी झालीच पाहिजे, नदीजोड प्रकल्प झालाच पाहिजे.
माकणे पाटील यांनी या ठरावांचे वाचन केले. पुढे अ.भा. छावाचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी या ठरावांवर प्रकाश टाकला. दारूमुळे पिढ्या बर्बाद होत आहेत. राजकारणी त्यांच्या स्वार्थासाठी युवा पिढीला व्यसनाधीन बनवित आहेत, असे ते म्हणाले. खोट्या अॅट्रॉसिटी केसेसचा कडाडून मुकाबला करा. छावा आपल्याबरोबर आहे, असा विश्वास त्यांनी दिला.
प्रारंभी, छत्रपती शिवराय आणि अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. अप्पासाहेब कुढेकर यांनी प्रास्ताविक केले. राजेश जाधव व डॉ. संदीप काळे यांनी सूत्रसंचालन केले. राष्टÑगीतानंतर कार्यक्रम संपला.
५८ मोर्चे काढून फरक नाही...
अ.भा. छावाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख विजय घाडगे पाटील यांच्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हार्दिक पटेल छावाबरोबर आला आहे. आता महाराष्टÑाचा मुख्यमंत्री सुखाची झोप घेणार नाही, असे उद्गार काढताच टाळ्यांचा कडकडाट झाला. मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले; पण फरक पडलेला नाही. आता समाजाच्या नावावरची दुकाने बंद झाली पाहिजेत.
शंभर शंभर संघटना... घरची बायकोही तुमच्याबरोबर असते की नाही माहीत नाही, अशा शब्दात घाडगे यांनी आजच्या वास्तवावर बोट ठेवले. समाज विखुरला जातोय. तो एका ट्रॅकवर आला पाहिजे, असे त्यांनी बजावले. लातूर जिल्ह्यात घडलेल्या अॅट्रॉसिटीच्या एका प्रकरणाकडे लक्ष वेधून त्यांनी सांगितले, भले आरक्षण दोन वर्षांनंतर द्या; पण अॅट्रॉसिटी कायदा संपूर्णत: रद्द झाला पाहिजे.
आम्हाला क्रांती हवी...
आता आम्हाला शांती नको तर क्रांती हवीय. मराठा समाजाच्या प्रश्नांवर मराठा समाजाचेच आमदार उभे राहिले नाहीत. मराठा समाजावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या कुटुंबियांचे सांत्वन करायलाही या पुढाºयांकडे वेळ नाही, अशी खंत अ.भा. छावाचे प्रदेशाध्यक्ष भीमराव मराठे यांनी व्यक्त केली. शेतकºयांना आत्महत्या न करण्याचा सल्ला देत मराठे यांनी नडलेल्या शेतकºयांची कर्जे छावा भरेल, असे जाहीर केले. विश्वजित जाधव यांचेही यावेळी भाषण झाले.