निमंत्रणपत्रिका बदलली, पण कोनशीला तशीच; लोकप्रतिनिधींची नावे वगळल्याने पुन्हा वाद
By संतोष हिरेमठ | Published: September 17, 2022 04:06 PM2022-09-17T16:06:17+5:302022-09-17T16:08:17+5:30
निमंत्रण पत्रिकेवरील नावे वगळल्याने झालेल्या वादावर ऐनवेळी नव्या निमंत्रण पत्रिका छापत विद्यापीठाने सारवासारव केली होती.
औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणाला काही तास शिल्लक असताना जागे झालेल्या विद्यापीठ प्रशासनाने शुक्रवारी नव्या निमंत्रण पत्रिका छापल्या. नव्या पत्रिकेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह स्थानिक खासदार आणि आमदारांची नावे नमूद करण्यात आली. मात्र, निमंत्रण पत्रिकेवरून सुरु झालेला वाद आता कोनशिलेवर गेला आहे.
अंबादासन दानवे यांच्यासह शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, नंदकुमार घोडेले, बाळासाहेब थोरात, तुकाराम सराफ, प्रतिभा जगताप, विनायक पांडे, मकरंद कुलकर्णी, नामदेव कचरे आदी पदाधिकाऱ्यांनी आज विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी अंबादास दानवे यांनी निमंत्रण पत्रिका बदलली, परंतु कोनशिला तशीच आहे ना, असे म्हणत कोनशिलेवरील नावांकडे लक्ष वेधले. कोनशिलेवर फक्त केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, राज्यातील मंत्री संदीपान भुमरे, उदय सामंत, अब्दुल सत्तार आणि अतुल सावे यांचीच नावे आहेत.
निमंत्रण पत्रिकेवरील नावे वगळल्याने झालेल्या वादावर ऐनवेळी नव्या निमंत्रण पत्रिका छापत विद्यापीठाने सारवासारव केली. मात्र, पुतळ्यावरील कोनशीला तशीच राहिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. हा कार्यक्रम विद्यापीठाचा होता, कुलगुरू प्रमोद येवले यांच्याविरोधात विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.