शिवरायांच्या पुतळा अनावरणाची मध्यरात्रीची वेळ बदला; शिवजयंती महोत्सव समितीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 04:53 PM2022-02-17T16:53:53+5:302022-02-17T16:54:16+5:30

राजकीय कार्यक्रमांना परवानगी आणि शिवप्रेमींना गुन्हे दाखल करण्याची धमकी

Change the midnight time of unveiling the statue of Chatrapati Shivaji Maharaj; Demand of Shiv Jayanti Festival Committee | शिवरायांच्या पुतळा अनावरणाची मध्यरात्रीची वेळ बदला; शिवजयंती महोत्सव समितीची मागणी

शिवरायांच्या पुतळा अनावरणाची मध्यरात्रीची वेळ बदला; शिवजयंती महोत्सव समितीची मागणी

googlenewsNext

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मूक पद्धतीने होऊच शकत नाही. यामुळे क्रांती चौकातील शिवरायांच्या पुतळा अनावरण सोहळ्याची मध्यरात्रीची वेळ बदला; अन्यथा रात्री १० वाजल्यानंतर शिवप्रेमींना वाद्य वाजविण्याची परवानगी द्या, अशी मागणी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख आणि माजी अध्यक्ष विनोद पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

क्रांती चौकातीलछत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण उद्या, शुक्रवारी मध्यरात्री करण्यात येणार असल्याचे महापालिकेने मंगळवारी (दि. १५) जाहीर केले. रात्री दहानंतर वाद्य वाजविण्यावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध आहेत. शिवजयंतीची जय्यत करणारे शिवप्रेमी क्रांती चौकातील शिवस्मारकाच्या अनावरण समारंभाचीही आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. शिवस्मारकाचे अनावरण मोठ्या जल्लोषात व्हावे, अशी लाखो शिवप्रेमींची इच्छा आहे. असे असताना मध्यरात्री मूक पद्धतीने अनावरण सोहळ्याचे आयोजन कशासाठी करण्यात आले आह? असा सवाल विनोद पाटील यांनी केला.

ते म्हणाले की, राज्यात विधान परिषद, काही जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, जिल्हा बँका आणि दूध संघांच्या निवडणुका झाल्या, तेव्हाच्या गर्दीत कोरोना पसरला नाही. आता परिपत्रक काढून शिवप्रेमींवर निर्बंध लादून गुन्हे दाखल करण्याचा इशारा देणे, हे अन्यायकारक आहे. शिवजयंतीनिमित्त मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या वाहन रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली. यामुळे बुधवारची रॅली रद्द करण्यात आली. एवढेच नव्हे तर कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिवसेनेनेही ‘एक राजा - एक जयंती’ या तत्त्वानुसार १९ फेब्रुवारी रोजीच्या शिवजयंतीत सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही करतो. शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करायचे, हा प्रशासनाचा निर्णय आहे. या पत्रकार परिषदेला महाेत्सव समितीचे राजू शिंदे, मनोज पाटील, प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, मनोज गायके, सुमित खांबेकर, राजगौरव वानखेडे आणि अप्पासाहेब कुढेकर उपस्थित होते.

आम्ही सायंकाळपासून जल्लोष करणार
शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण मध्यरात्री असले तरी जिल्हा शिवजयंती महोत्सव समिती दुपारी चार वाजल्यापासूनच क्रांती चौकात जल्लोषाला सुरुवात करील. शासनाने शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून परिपत्रक काढून १८ फेब्रुवारी रोजी रात्रभर वाद्य वाजविण्याची परवानगी द्यावी, अशी समितीची मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title: Change the midnight time of unveiling the statue of Chatrapati Shivaji Maharaj; Demand of Shiv Jayanti Festival Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.